सिप्ला कंपनीचा औषध विक्री परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आज प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्लावर मोठी कारवाई केली. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील औषध विक्रीचे परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. ‘रिॲक्टिन प्लस’च्या पॅकेजिंगवर बेकायदेशीर जाहिरात करणे, तसेच या औषधांची साठवणूक करताना नियमांचे उल्लंघन करणे या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. या औषधाचा साठाही एफडीएने जप्त/रद्द केला आहे.

एफडीएने जून २०२६ मध्ये वडकी येथील सिप्लाच्या मुख्य गोदामाची अचानक पाहणी केली होती. तेथील ‘रिॲक्टिन प्लस’ या ‘शेड्युल एच’मधील औषधाच्या पॅकेजिंगवर ‘अनाल्जेसिक व अँटीपायरेटिक’ असा मजकूर बेकायदेशीररीत्या जाहिरातीच्या स्वरूपात छापल्याचे दिसून आले होते. हे ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमांचे’ उल्लंघन होते. अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे नागरिकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेण्याची, म्हणजेच ‘सेल्फ-मेडिकेशन’ची प्रवृत्ती बळावून सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेत एफडीएने या औषधाचा साठा बाजारातून तत्काळ मागे घेण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे, तर औषधांच्या साठवणुकीसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती आणि औषधे जमिनीवर ठेवण्यात आल्याचेही पाहणीत दिसून आले.

“आरोग्याशी खेळाल तर कठोर कारवाई!” – तुकाराम मुंढे नागरिकांचे आरोग्य आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही, असा इशारा या निमित्ताने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.