
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या भूखंडावर डल्ला मारल्याप्रकरणी बिल्डरसह सोसायटीच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भूखंडावरील बांधकाम हटवण्याचे आदेश अप्पर तहसीलदारांनी दिले होते. मात्र त्यानंतरही हे बांधकाम हटवले गेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
नवघर परिसरातील सर्व्हे क्रमांक १२२मधील २.२० हेक्टर क्षेत्रफळाची जमीन पोलीस विभागाच्या मालकीची आहे. आरक्षण क्रमांक ३०० नुसार ही जमीन पोलीस आयुक्तालयाच्या मैदानासाठी राखीव आहे. जमीन पोलीस विभागाच्या मालकीची असल्याची माहिती असतानाही विकासक सलीम गहलोत आणि रविराज पाल्म्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी संगनमत करून या जागेवर डल्ला मारला आणि अतिक्रमण केले.
या अतिक्रमण प्रकरणात मीरा-भाईंदरच्या अप्पर तहसीलदारांनी १७ जून रोजी सदर अनधिकृत बांधकाम हटविण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम हटविले नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलिसांनी विकासक सलीम गहलोत तसेच रविराज पाल्म्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याच्या या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या आदेशानंतरही बांधकाम न हटविल्याने संबंधितांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.






























































