
पनवेल विधानसभा मतदारसंघातील तब्बल ३ हजार ४०० ‘एसआयआर’ (SIR) फॉर्मचे गठ्ठे झेरॉक्स सेंटरवर नेऊन त्याच्या प्रती काढणारा खारघर भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी सूरज पाटील याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, हे फॉर्म सूरज पाटील याला देणाऱ्या पाच ‘बीएलओ’ना (BLO) तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. शासकीय कामकाजात गंभीर हलगर्जीपणा आणि निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेने सूरज पाटीलला रंगेहाथ पकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पर्दाफाश केला होता. त्या दणक्यानंतर प्रशासन हादरले आणि त्यांनी आज ही कारवाई केली.
खारघर भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी सूरज पाटील हा एसआयआरच्या हजारो फॉर्मचे गठ्ठे घेऊन त्याची झेरॉक्स काढण्यासाठी एका झेरॉक्स सेंटरवर आला होता. त्याच वेळी शिवसेनेचे विभागप्रमुख बालेश भोजने हे तिथे पोहोचले आणि त्यांनी या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर सूरज पाटील याने आपल्या एका हस्तकासह बालेश भोजने यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, भोजने यांनी त्यांचा हा डाव उधळून लावत पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन एसआयआरचे ३ हजार ४०४ फॉर्म आणि सूरज पाटीलला ताब्यात घेतले. मात्र, सूरज पाटील पोलीस ठाण्याच्या आवारातून फरार झाला. या घटनेनंतर शिवसेनेचे उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, रामदास पाटील, नगरसेविका लीना गरड, ॲड. समाधान काशीद, प्रवीण जाधव, नितीन देशमुख, सदानंद शिर्पे, विश्वास पेटकर, नगरसेवक उत्तम मोर्बेकर आदी पदाधिकारी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तत्काळ शोध घेण्याची मागणी केली.
बीएलओंवर शिस्तभंगाचा बडगा
या घटनेची गंभीर दखल घेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि प्रांताधिकारी पवन चांडक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तपासादरम्यान ज्या पाच बीएलओंच्या दप्तरातून एसआयआर फॉर्म्स भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे गेल्याचे निष्पन्न झाले, त्या पाचही बीएलओंना तत्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आल्याचेही जावळे यांनी स्पष्ट केले.
शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
“एसआयआरचे फॉर्म भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पोहोचलेच कसे?” असा सवाल करत शिवसैनिकांनी पोलिसांना धारेवर धरले. जोपर्यंत तहसीलदार पोलीस ठाण्यात येऊन या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत आपण ठाण्यातून हटणार नाही, असे पोलिसांनी ठणकावून सांगितले. शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरा पनवेलचे नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी या एसआयआर फॉर्म चोरीचा पंचनामा केला व तसा अहवाल प्रशासनाला पाठवला.
नावे गोपनीय ठेवली
प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार विभागीय चौकशी सुरू असल्याने संबंधित बीएलओंची नावे सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहेत. तपासाच्या पुढील टप्प्यात ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. “जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई हा शिवसेनेच्या आंदोलनाचा मोठा विजय आहे. एसआयआर प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि निष्पक्षपातीपणे सुरू असल्याचा दावा फोल ठरला असून निवडणूक आयोगालाही हा मोठा झटका आहे,” अशी प्रतिक्रिया बबन पाटील आणि प्रसाद भोईर यांनी व्यक्त केली.





























































