
अमेरिकेत हिंदुस्थानी तरुणीची हत्या करणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनंतर आग्र्यातून अटक करण्यात आली. हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन नागरिक निकिता राव गोदिशलाची जानेवारी महिन्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा फरार झाला होता. या अर्जुन शर्माला पोलिसांनी आग्र्यातून अटक केली आहे.
२०० वर्षे जुना गुरुद्वारा पाडला क्वेटा:
पाकिस्तानातील २०० वर्षे जुना ऐतिहासिक सिंह सभा गुरुद्वारा पाडण्यात आला आहे. आता या जागेवर एक मॉल बांधण्यात येणार आहे. बलुचिस्तान गुरुद्वारा सिंह सभेचे सदस्य सरदार जसबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शीख समाजाने याचा विरोध केला असून सरकारने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप नवी दिल्ली:
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी (ISI) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील साहिल आणि त्याची पत्नी समीरा या जोडप्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे २०२४ पासून पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ते हिंदुस्थानातील संवेदनशील माहिती गोळा करून देत होते.
बसची भिंतीला धडक, चौघांचा मृत्यू भोपाळ:
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात भोपाळ बायपास पुलावर अनियंत्रित झालेली बस भिंतीला धडकली. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही बस कानपूरहून इंदूरला येत होती. मृत्यू झालेल्यांमध्ये बसचालक आणि एका सायबर इन्स्पेक्टरचाही समावेश आहे. या अपघातात एकूण ११ प्रवासी जखमी झाले.
ट्रम्प यांनी ओंटारियोचे नाव बदलले वॉशिंग्टन:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओंटारियो सरोवराचे नाव बदलून आता ‘लेक अमेरिका’ केले आहे. या आदेशावर स्वाक्षरी केली असून ३० दिवसांनंतर अमेरिकेच्या सरकारी नकाशे व नोंदींमध्ये नवे नाव वापरले जाईल. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मात्र या नामकरणाला विरोध केला आहे.






























































