
नेपाळमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून रस्ते, पूल, घरे, वाहून गेली आहेत. या प्रलयामध्ये आतापर्यंत 579 नागरिकांचा मृत्यू झाला असून 1900 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. त्यात हिंदुस्थानच्या 320 नागरिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी नेपाळ-तिबेट सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला. चोचेन नदी आणि पुरेपु त्सांगपो नदीच्या संगमाजवळ तयार झालेला हा तलाव आहे. तलाव फुटल्यानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे रसुवा जिह्यातील बचावकार्यात अडचण येत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून भोटेकोशी, त्रिशुली आणि नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत. चीनने दुसऱ्या पुराच्या धोक्याचा हवाला देत तिबेटमधील मदत आणि बचाव कार्य स्थगित केले असून लेव्हल 4 चा इशारा जारी केला आहे.
हिंदुस्थानींसाठी 24 तास हेल्पलाइन नंबर
नेपाळमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने 24 तास पंट्रोल रूम सुरू केला आहे. भारतीय नागरिक +91 11 2308 8718 किंवा +91 11 2308 8719 या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. व्हॉट्सअॅप कॉल किंवा मेसेजसाठी +91 9968291988 हा क्रमांक उपलब्ध आहे. तसेच [email protected] या ई-मेलवरही मदत मागता येईल.
अखेर परदेशी मदतीसाठी नेपाळ तयार
नेपाळ सरकारने हिंदुस्थान, चीन, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांकडून आलेल्या परदेशी बचाव पथकांचे प्रस्ताव नाकारले होते. मात्र प्रलयामध्ये अनेक परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक बेपत्ता आहेत. त्यामुळे विविध देशांकडून वाढत्या दबावामुळे नेपाळने परदेशी मदत स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. हिंदुस्थान, चीन, ऑस्ट्रेलिया आणि द. कोरियाची पथके बचावकार्यास मदत करतील.
मृतदेहाच्या दागिन्यांची लूट
नेपाळमध्ये अवघ्या काही मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. शेकडो लोकांचा जीव गेला. जवळच्या नातलगांना शोधण्यासाठी धावाधाव सुरू असताना काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. काही लोक मृतदेहाच्या अंगावरील दागिने लुटताना दिसत आहेत. याचे पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मृतदेह आल्यावर दोन तरुण त्या बेवारस मृतदेहाच्या अंगावरील सोनं चोरताना दिसत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील 10 पर्यटक अडकले
नेपाळमधील महापुरात ठाणे जिह्यातील 10 पर्यटक अडकले आहेत. विविध टूर कंपन्यांसोबत सर्व पर्यटक गेले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील रेखा पाटणकर, अपर्णा जोशी, समीर जोशी, सतीश पाटणकर, सुनील सुभेदार, संजय पाटील, नलिनी पाटील, रजनीश नातू, यशास भांड, अभिषेक घोण हे दहाजण नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. रायगड व ठाण्यातील सर्व नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
येथे संपर्क साधा
नेपाळमधील पूरस्थितीमुळे अडकलेल्या ठाणे जिह्यातील ज्या पर्यटकांशी संपर्क साधण्यात अडचणी असतील अशा नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राशी 9372338827 पिंवा 022- 25301740 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. त्या शिवाय 1077 या क्रमांकाचा टोल फ्री नंबरही जारी करण्यात आला आहे.
उपग्रहांद्वारे टिपलेल्या छायाचित्रांमध्ये स्याप्रू बेसी येथील 18 ऑक्टोबर 2023 रोजीची स्थिती दिसत आहे.
महाप्रलयानंतर झालेला विध्वंस दुसऱ्या छायाचित्रात दिसतो. हे छायाचित्र 27 ऑगस्ट 2026 रोजी टिपले आहे.
































































