अभिषेक घरी येईल याची वाट पाहतेय…त्याला राखी बांधायची आहे! नेपाळच्या प्रलयात अडकला; बहिणीची आर्त साद, मदतीची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज रक्षाबंधन असल्याने अभिषेकसाठी मी त्याला आवडणारी राखी आणून ठेवली आहे. तो दरवाजा उघडून कोणत्याही क्षणी घरात येईल असे वाटते. मी त्याची आतुरतेने वाट पाहतेय.. त्याला राखी बांधायची आहे, अशी आर्त साद नेपाळच्या प्रलयात अडकलेल्या कल्याणमधील अभिषेक घोणे याच्या बहिणीने घातली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. अभिषेकचा गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब हे प्रचंड तणावाखाली आहे.

कल्याणच्या ठाणकरपाडा येथे राहणारा 28 वर्षीय अभिषेक घोणे पैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी काठमांडूकडे रवाना झाला. मंगळवारी बुद्ध गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केल्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक पुढील प्रवासासाठी निघाला. मात्र, नेपाळ-तिबेट सीमेच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. त्याने आपल्या वडिलांसोबत शेवटचा संपर्क साधला. आपल्यासोबत 90 पर्यटक असून काही काळजी करू नका, असे त्याने सांगितले. त्यानंतर लगेच पह्न कट झाला आणि संपर्क तुटला.

अभिषेक नेमका कुठे आहे व कसा आहे याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने त्याचे वडील सुरेश घोणे, आई व बहीण तणावाखाली आहेत. आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत असतानाच आपला भाऊ घरी नाही हे बघून तिच्या डोळय़ातून अश्रूधारा वाहत होत्या. आपला भाऊराया येईल आणि त्याला मी राखी बांधेन, असे ती सतत सांगत होती. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने सरकारने सुटकेसाठी त्वरित मदत करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

तीन पर्यटक नॉटरिचेबल

नेपाळच्या प्रलयात कल्याणमधील संजय पाटील व त्यांच्या पत्नी नलिनी पाटील तसेच डोंबिवलीत राहणारे सुनील सुभेदार असे तिघेजण हे नॉटरिचेबल असून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुनील सुभेदार हे हिल्स अॅण्ड ट्रेल्स या कंपनीच्या माध्यमातून पैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळला रवाना झाले. मात्र दुपारनंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. पाटील दांपत्याचा मुलगा परदेशात राहात असून तो आपल्या आईवडिलांना शोधण्यासाठी नेपाळला रवाना झाला असल्याचे शेजाऱयांनी सांगितले.

मंगळवारपासून संपर्क नाही

रिचा टुर्सने पैलास-मानसरोवर यात्रेला नेलेल्या यात्रेकरूंपैकी प्रेरणा काळे या बेपत्ता आहेत. नेपाळ महाप्रलयानंतर काळे यांच्यासोबत संपर्क तुटल्याचे दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन सांगितले. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजतापासून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सर्व सरकारी यंत्रणांची मदत घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही, अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

नेपाळमध्ये युद्धपातळीवर बचाव कार्य राबवण्यात येत आहे. नेपाळच्या सैन्याचे जवान ठिकठिकाणी शोध घेऊन बचावलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहेत.

हे 37 पर्यटक काठमांडू येथून आज परतणार

प्रमोद केने, शशिकांत पानगावकर, दतात्रय जोशी, हेमंत दांडेकर, नितीन गांधी, दिनेश गांधी, बजरंग परब, संतोष आलुरकर, समीर घोडेराव, राकेश जितेकर, श्रीकांत ढवले, सुरेंद्र जोशी, श्रीकांत पाटील, आदित्य देशमुख, नितीन शिर्पे, संजय देशपांडे, विवेक पांडे, सोनाली बेलोसे, सुनीता पानगावकर, स्नेहा कुलकर्णी, सुवर्णा जोशी, वृषाली पुराणिक, रश्मी सेठ, पूनम सबनीस, शमा साठे, रेणुका आलुरकर, आरती काकरमठ, अपर्णा कदम, माधवी जोशी, रुचा पाटील, सोनल जोशी, सीमा शिंपी, हेमलता बोरसे, अंजना राजपूत, संगीता देशपांडे, स्नेहा पांडे, वर्षा कारी.