आधी प्रश्नपत्रिका पाहिली, मग स्वच्छतागृहात जाऊन उत्तरे शोधली; पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेतील गैरप्रकार उजेडात; तिघांची निवड रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या तीन उमेदवारांचे बिंग फुटले असून, त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षा देताना या तिघांनी आधी प्रश्नपत्रिका पाहिली, त्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन उत्तरे शोधून पेपर सोडविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या उमेदवारांसह छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या १६९ पदांसाठी एप्रिलमध्ये सात सत्रांत ऑनलाइन परीक्षा घेतली होती. २० हजार ७०० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. निकालानंतर ५४५ उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान, परीक्षेतील एका प्रश्नाचा संगणकावरील फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर काही उमेदवारांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानुसार ‘आयबीपीएस’ (IBPS), ‘टीसीएस’ (TCS) आणि ‘अर्न्स्ट अँड यंग’ या संस्थांकडून स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात आली.

या तपासात तीन उमेदवारांची उत्तरे देण्याची पद्धत संशयास्पद आढळली. या उमेदवारांनी सुरुवातीला प्रश्न पाहिले; मात्र उत्तरे नोंदविली नाहीत. त्यानंतर ते वारंवार स्वच्छतागृहात गेले आणि परत आल्यानंतर अल्पावधीत मोठ्या संख्येने उत्तरे नोंदविली. त्यांनी जमा केलेल्या रफ शीटवरील नोंदीही सोडविलेल्या प्रश्नांशी सुसंगत नव्हत्या. तसेच, सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये (CCTV footage) उमेदवार स्वच्छतागृहात जात असताना केंद्रावरील विद्युत कर्मचारी आणि पायाभूत सुविधांसाठी नियुक्त कर्मचाऱ्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. संबंधित संस्थेने या दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले आहे.

“उपलब्ध पुरावे आणि डेटा लॉगच्या विश्लेषणात प्रश्नपत्रिका फुटल्याचे आढळलेले नाही. हा गैरप्रकार फक्त तीन उमेदवारांपुरता मर्यादित असून नियुक्तीपूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील बाबी पोलीस तपासातून स्पष्ट होतील.”

प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त