
आर्थिक स्थिती बेताची असलेल्या महाराष्ट्राच्या लालपरीवर यंदाच्या दिवाळीत चांगलीच लक्ष्मीकृपा झाली. अवघ्या 16 दिवसांत एसटीने 548 कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच दररोज सरासरी 34 कोटींवर उत्पन्न मिळवले. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीच्या गल्ल्यात एकाच दिवसात 46 कोटी 53 लाख रुपये जमा झाले.
दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाण्यासाठी राज्यातील नागरिकांनी लालपरीला भरभरून पसंती दिली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत एसटीने तब्बल 548 कोटी 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून दररोज सरासरी 34 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात 46 कोटी 53 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. दिवाळीतील हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे एसटीवरील जनतेच्या अढळ विश्वासाची पावतीच ठरली आहे. असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.



























































