
एप्रिलपासून देशभरात २० टक्के इथेनॉलमिश्रित म्हणजेच ई-२० पेट्रोल दिले जात आहे. या ई-२० पेट्रोलला देशभरातून प्रचंड विरोध होत आहे. तरीही सरकार मागे हटायला तयार नाही. या पेट्रोलमुळे जुन्या वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे काही दिवसांत या वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी बाजारात पुन्हा जुने ई-१० पेट्रोल आणले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खन्ना यांनी म्हटले की, ई-२० पेट्रोल मागे घेण्याचा किंवा ते बदलण्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही. त्यांच्या या विधानामुळे आता देशात ई-१० पेट्रोल पुन्हा येण्याची शक्यता मावळली आहे.
बीपीसीएलची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत बोलताना संजय खन्ना यांनी जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल ब्लेंडिंग असलेल्या इंधनाचा पर्याय देण्याच्या शक्यतेवर भाष्य केले होते. कंपनी याच्या विविध ऑपरेशनल बाजू तपासून पाहत असून अजून काही निश्चित झालेले नाही, असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर बाजारात ई-२० ऐवजी पुन्हा ई-१० पेट्रोल येणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. परंतु यावर आता पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारी पातळीवर ई-२० बदलून ई-१० आणण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. वाढत्या चर्चांनंतर बीपीसीएलने ‘एक्स’वर स्पष्टीकरण जारी करत म्हटले की, संजय खन्ना यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.
जुन्या वाहनधारकांची चिंता वाढली एप्रिल २०२३ नंतर उत्पादित झालेली वाहने ही ई-२० सुसंगत आहेत. परंतु, त्याआधीच्या जुन्या गाड्या या ई-१० इंधनासाठी डिझाईन करण्यात आल्या आहेत. ई-२० मुळे जुन्या गाड्यांचे पार्ट्स खराब होण्याची भीती आहे. जुन्या वाहनांमधील रबर, प्लॅस्टिकचे होजेस आणि फ्युएल लाइन्स खराब होऊ शकतात. ई-२० मुळे या गाड्यांचे मायलेज काही टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळेच सरकारने जुन्या वाहनांसाठी ई-१० पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.






























































