
दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थान विजयाच्या उंबरठय़ावर असताना श्रीलंकन फलंदाजांनी हिंदुस्थानच्या घशातून विजयाचा घास काढून घेतला. या निकालानंतर श्रीलंकेचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी खेळपट्ट्यांबाबत केलेल्या विधानाने हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या रणनीतीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘हिंदुस्थानप्रमाणेच श्रीलंकेतही फिरकीला पोषक खेळपट्टय़ांना महत्त्व दिले जाते, मात्र केवळ फिरकी गोलंदाजांना अनुपूल खेळपट्ट्या तयार करून मजबूत कसोटी संघ उभा करता येत नाही’, असा खोचक टोला कर्स्टन यांनी लगावला.
गंभीर यांच्या रणनीतीशी तुलना
हिंदुस्थान मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टय़ांना मोठे महत्त्व दिले जाते. मात्र, अलीकडील काही मालिकांमध्ये या रणनीतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिंदुस्थानला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे केवळ फिरकीला अनुपूल परिस्थिती निर्माण करण्याऐवजी फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या तिन्ही विभागांना आव्हान देणाऱया खेळपट्टय़ा तयार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका कर्स्टन यांनी घेतली.
दोन्ही कसोटी पाचव्या दिवसापर्यंत
हिंदुस्थान-श्रीलंका मालिकेतील दोन्ही कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत रंगले. आधुनिक कसोटी क्रिकेटमध्ये सामने लवकर संपत असताना पाच दिवस खेळ चालणे ही बाबही या मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील संघर्षाला पुरेशी संधी मिळाल्याचे कर्स्टन यांनी सांगितले.
फक्त फिरकीसाठी खेळपट्टी नको
कर्स्टन म्हणाले, संघातील प्रत्येक गोलंदाजाला वेगवेगळ्या परिस्थितीत सामना जिंकण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. आम्ही केवळ फिरकी गोलंदाजांसाठी खेळपट्टय़ा तयार करत नाही. आमचे वेगवान गोलंदाजही सामने जिंपू शकतील, अशा खेळपट्टय़ा तयार करण्यावर आमचा भर आहे. या प्रकारेच सर्व प्रकारच्या परिस्थितीत खेळू शकणारा संघ तयार होतो. या मालिकेतील दोन्ही खेळपट्टय़ांनी मला खूप प्रभावित केले. आमच्या फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी करावी, फिरकी गोलंदाजांनी कठोर परिश्रम करावेत आणि वेगवान गोलंदाजांनीही आपले काम चोख बजावावे, अशी आमची इच्छा आहे. गॉल कसोटीच्या दुसऱया डावात आमच्या वेगवान गोलंदाजांनी 10 पैकी सात बळी घेतले.






























































