
पायी जाणाऱ्या वृद्धांना रस्त्यात एकटे पाहून अडवायचे, ‘पुढे मोठी गडबड झाली आहे’ किंवा असे काहीतरी खोटे सांगून बोलण्यात गुंतवायचे आणि त्यांचा किमती ऐवज घेऊन पसार व्हायचे. अशा प्रकारे ‘बोलबच्चनगिरी’ करून अनेक वृद्धांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
प्रभादेवी मंदिरासमोरील पाटील वाडीत राहणारे चंद्रशेखर पारकर (७८) हे सेवानिवृत्त नागरिक २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास परिसरातील दत्त मंदिरात पायी निघाले होते. त्या वेळी दोघांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) आणि एक हजार रुपये शिताफीने काढून घेतले. त्यानंतर चंद्रशेखर यांना काही कळायच्या आतच दोघांनी तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंद्रशेखर यांनी तात्काळ दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी उरण येथे लपून राहत असल्याचे समजले. त्यानुसार राहुल वाघमारे व त्यांच्या पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सलग दोन दिवस सापळा रचून नरेश जयस्वाल (४५) आणि रमेश जयस्वाल (५०) या दोघांना ताब्यात घेतले.
नरेशविरोधात २१ गुन्ह्यांची तर रमेशविरोधात आठ गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींनी अलीकडेच माहीम, भांडुप, सायन, धारावी, मुलुंड, वांद्रे, सांताक्रूझ आदी ठिकाणी अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.





























































