
डोंबिवलीकर महिलेच्या बँक खात्याचा वापर करून राजस्थानमध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी देविका पंडाराम (३८) यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आपला काही संबंध नसतानाही सायबर फ्रॉडची नोटीस आल्याने त्या तणावात होत्या. या तणावातूनच देविका यांनी मंगळवारी ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील सांगर्ली येथील देविका यांचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या टिळकनगर शाखेत खाते होते. या खात्याशी संबंधित व्यवहारांप्रकरणी राजस्थानमधील चुरू सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली होती. तसेच दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि तामीळनाडू येथेही त्यांच्या बँक खात्याशी संबंधित सायबर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसतानाही आपल्याविरुद्ध गुन्हे कसे दाखल झाले? याबाबत देविका यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाकडे चौकशी केली होती. या प्रकारामुळे त्या मानसिक तणावात होत्या.
हकनाक बळी
सायबर गुन्ह्याशी आपला काहीही संबंध नसताना पोलिसांकडून काहीच सहकार्य मिळत नसल्याने देविका यांच्यासह पंडाराम कुटुंब तणावात होते. अखेर मंगळवारी दुपारी चार वाजता सांगर्ली येथील घरी देविका यांनी स्वतःवर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. देविका यांचा हकनाक बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.































































