
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. यासाठी मिळणाऱ्या सरकारच्या पैशातून मोठे भ्रष्टाचार होत आहेत. या विकास कामांच्या नावावर संपूर्ण नाशिक खोदून ठेवले आहे. या खड्ड्यांमुळे आत्तापर्यत 12 जणांचा बळी गेला आहे. मात्र यावर एक शब्दही न बोलता विरोधकांवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांची अवस्था गांधीजींच्या माकडांसारखी झालेली आहे. ते भ्रष्टाचाराविषयी ऐकणार नाही, बोलणार नाही आणि भ्रष्टाचार यांना दिसणारही नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबईत शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्त आयोजित मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर हल्लाबोल केला. नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आणि मेळाव्यावर अक्षरश: बहिष्कार टाकलेला आहे. या मेळाव्यातल्या 90 टक्के खुर्च्या रिकाम्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाषणात आमच्यावर केलेली टीका ऐकणार कोण? तिथे टीका ऐकायला जनता हवी ना, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
नाशिकमधला भ्रष्टाचार हा महाराष्ट्रातला सर्वोच्च भ्रष्टाचार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर आम्हीच टीका करतोय का? साधु-संत देखील त्यावर टीका करत आहेत. कुंभमेळ्याला येणारे जे साधु-संतही कुंभमेळ्यात भ्रष्टाचार सुरू आहे, असे म्हणत असल्याचे राऊत म्हणाले.
जनतेचा बहिष्कार; तरीही यांना मतदान करतात कोण?
फडणवीसांसमोरील खुर्च्या मोकळ्या, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा सवाल pic.twitter.com/77PtzNPHKc— Saamana Online (@SaamanaOnline) August 29, 2026
मुख्यमंत्री मेळाव्यासाठी काल उडत उडत गेले का? त्यांना खड्डे, रस्त्याची दुर्दशा दिसली नाही, त्यांना कुंभमेळ्या निमित्त सुरू असलेली टेंडरबाजी आणि त्यातली कमिशनबाजी दिसली नाही का? असे सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनकडे आता लोकांनी गांभीर्याने पाहणं सोडून दिल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
विरोधी पक्षाने मांडलेल्या भूमिकेवर आत्मचिंतन करण्याची महाराष्ट्राची परंपरा यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या काळापासून चालत आली आहे, मात्र हे सरकार भ्रष्टाचाराला समर्थन देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. बहुमत असले तरी अशा पद्धतीने राज्य चालवणारे सरकार फार काळ टिकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी 45 हजार कोटींचे बजेट आहे, त्यातले किमान 25 हजार कोटी हे तुमचे कुंभमेळा मंत्री आणि त्यांचे अधिकारी उडवणार आहेत आणि उडवायची सुरुवातही झालेली आहे, असा गंभीर आरेप संजय राऊत यांनी केली. यासंदर्भात नाशिककरांनी वारंवार मोर्चे काढले, ते रस्त्यावर उतरले, महानगरपालिकेत त्याच्यावर चर्चा झाल्या. आत्तापर्यंत 12 जणांचे बळी गेले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकायला येत नाही. मुख्यमंत्र्यांची अवस्था महात्मा गांधींच्या काळातील तीन माकडांप्रमाणे झालेली आहे. गांधींची माकडं ही सत्याच्या बाजूने होती. पण हे भ्रष्टाचाराविषयी ऐकणार नाही, यांना भ्रष्टाचार दिसणार नाही आणि भ्रष्टाचाराविषयी कोणी तक्रार केली तरी त्यावर हे बोलणार नाही अशी तीन माकडांची परिस्थिती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, आता जागोजागी भ्रष्टाचार होतोय. आता राज्यात धार्मिक, अध्यात्मिक कार्य घडत असताना जे मुख्यमंत्री राममंदिराच्या लुटीवर बोलायला तयार नाहीत. ते कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर काय बोलणार. ज्यांच्या लोकांनी राम मंदिराची दानपेटी लुटली त्यांचे हे सगळे वारसदार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्यामुळे त्यांना कुंभमेळातला भ्रष्टाचार दिसणारच नाही.
सरकारच्या विकास कामांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विकास काम पूर्ण होतीत तेव्हा हार काय पालखीत बसवून आम्ही घेऊन जाऊ. पण ही विकास काम एकाचं वेळी तुम्ही करताय, म्हणजे तुमचं नियोजन नाही. कोणतीही योजना नाही फक्त टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरना काम देणं एवढं तुमचं काम आहे. आपण साधारण दहा वर्षापूर्वी हे शहर दत्तक घेतलाय हे तुम्ही विसरलात आणि आपण दत्तक घेतल्यापासून नाशिक शहराची दुर्गती सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री खोट बोलतात, त्यांना खोटं बोलण्यासंदर्भात एक डीग्री द्यावी लागेल. जशी मोदींना दिल्ली विद्यापीठातून मास्टर डिग्री इन एन्टायर पॉलिटीक्समध्ये डीग्री मिळालेली आहे. तशी य़ांनासुद्धा अशाप्रकारची मास्टर डीग्री द्यावी लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.






























































