
ताम्हिणी घाटातील कोंढेथर गावच्या हद्दीत दरीमध्ये बेवारस अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन संशयित आरोपींना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले असून मारेकऱ्यांनी या महिलेला घातात फिरण्याच्या बहाण्याने नेऊन तिथे ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह दरीत फेकल्याचे तपासात उघड झाले आहे.
२५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ताम्हिणी घाट परिसरातील मौजे कोंढेथर गावच्या हद्दीत पुणे माणगाव मार्गालगत दरीमध्ये २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मृत महिलेचे नाव सुमन यादव, (रा. चिखली, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढला.
मृत महिलेची ओळख पटली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून तपासाला वेग देण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सुरज पाटील, नरेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, विनोद पाटील, अमोल हंबीर, रूपेश निगडे, रवींद्र मुंढे, प्रतीक सावंत, शाम खराडे, रणजितसिंग खराडे, मनोहर शिरतार, अक्षय पाटील, सचिन वावेकर, सागर थळे, प्रशांत लोहार, प्रदीप खरात, अक्षय जगताप, तुषार घरत यांच्या पथकाने कारवाई करत दुर्गाप्रसाद प्रजापती (२४) आणि दिनेशकुमार प्रजापती (२७) या दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.




























































