मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्णच: खारपाड्यातील टोलधाड बंद करा, जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना प्रवाशांच्या खिशावर दरोडा टाकण्यासाठी खारपाडा येथे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. यावरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याने याचे तीव्र पडसाद आज रायगड जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत उमटले. आधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा नंतरच टोल वसूल करा, असा एकमुखी ठरावच करण्यात आला असून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार आता तरी ही टोलधाड बंद करेल का, असा सवाल कोकणवासीयांनी केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. गणेशोत्सव जवळ आला की संबंधित खात्याचे मंत्री दरवर्षी दौरे करून महामार्ग कधी पूर्ण होणार याच्या नवीन तारखा जाहीर करतात. परंतु अजूनही काही उड्डाणपूल तसेच सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण आहेत. नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर तसेच अनेक भागांत रस्त्यांची दुरावस्था झाली असून खड्ड्यांनी वाहनचालक तसेच प्रवाशांना नकोसे केले आहे. असे असताना खारपाडा येथे टोलनाका सुरू करून प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारण्यात आला आहे. यावरून सरकारवर टिकेची झोड उठली आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलनही केले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या रायगड जिल्हा शांतता समितीने टोलनाका बंद करावा यासाठी ठराव केला आहे.

काय आहे ठरावामध्ये..

शांतता समितीच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली करू नये, असा ठराव मांडला. त्यावर अन्य सदस्यांनीही महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करा, अशी ठाम भूमिका मांडली. या ठरावाला एकमुखाने मंजुरी देण्यात आली असून हा ठराव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे वाहनचालक आणि कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

चाकरमान्यांच्या डोळ्यांत धूळफेक करू नका

शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करूनदेखील मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे गेल्या १५ वर्षांत हजारो अपघात होऊन शेकडो निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. तर अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. असे असताना टोलवसुली सुरू करून सरकारने आपली संवेदनशीलता दाखवली आहे. यावरून गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता असल्याने शांतता समितीने हा ठराव तर केला नाही ना, असा संशय आहे. त्यामुळे आता तरी डोळ्यांत धूळफेक करू नका, असा संताप चाकरमान्यांनी व्यक्त केला आहे.