‘तुमची मदत नको’ म्हणणाऱ्या नेपाळचा 24 तासांत यू-टर्न, हिंदुस्थान-चीनच्या विशेष बचाव पथकांना अखेर परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये आलेल्या महापुरामध्ये आतापर्यंत 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 2 हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. यात हिंदुस्थानसह जगभरातील पर्यटकांचाही समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीवेळी हिंदुस्थानने शेजारधर्म जपत नेपाळला वैद्यकीय आणि बचाव साहित्य पाठवले आहे. तसेच बचाव कार्यात मदत करण्याचा मानसही हिंदुस्थानसह अनेक देशांनी व्यक्त केला होता. मात्र नेपाळने तुमची मदत नको म्हणत स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता.

सुरुवातीला आंतरराष्ट्रीय मदत नाकारणाऱ्या नेपाळ सरकारने अवघ्या 24 तासांमध्ये आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली नदीला पुरामध्ये अनेक परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाढलेल्या प्रचंड राजनैतिक दबावानंतर नेपाळने हिंदुस्थान, चीन, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या तज्ज्ञ पथकांना बचाव कार्यात उतरण्याची परवानगी दिली आहे.

नेपाळ सरकारने स्थानिक बचाव पथके या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असल्याचे सांगत परदेशी बचाव पथकांना नकार दिला होता. मात्र, तांत्रिक आणि विशेष मदतीची निकड भासू लागल्याने नेपाळ सरकारने यू-टर्न घेत टनेल रेस्क्यू, डीएनए चाचण्या आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी परदेशी तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपले नागरिक बेपत्ता असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून किमान शोध व बचाव पथके पाठवण्यासाठी मोठा दबाव होता. त्यामुळे आम्ही विशिष्ट क्षेत्रांतील तज्ज्ञांना मर्यादित प्रवेश देत आहोत, अशी माहिती नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

2000 हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

नेपाळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या अहवालानुसार, महापुरात आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 2000 हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. यात हिंदुस्थान, चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांचाही समावेश आहे.

अभिषेक घरी येईल याची वाट पाहतेय…त्याला राखी बांधायची आहे! नेपाळच्या प्रलयात अडकला; बहिणीची आर्त साद, मदतीची हाक

अप्पर त्रिशुली-1 जलविद्युत प्रकल्पात शेकडो कामगार अडकले

अप्पर त्रिशुली-1 या 216 मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आपत्तीच्या वेळी या ठिकाणी सुमारे 1,350 कामगार कार्यरत होते. त्यापैकी 576 कामगारांशी संपर्क तुटला आहे. मलब्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यात नेपाळच्या बचाव पथकाला अडचण येत असल्याने हिंदुस्थानच्या अनुभवी टनेल रेस्क्यू टीमची मदत घेतली जात आहे. हिंदुस्थानच्या तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेईल आणि कामगारांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती रणनीती आखेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. यासाठी रॅट होल मायनिंग पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे.

4 विमानांनी तातडीने मदत रवाना

हिंदुस्थानने नेपाळला मदतीचा हात पुढे केला असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. हिंदुस्थानची चार विमाने नेपाळला मदत घेऊन पोहोचली आहेत. हिंदुस्थानने पाठवलेल्या चौथ्या टप्प्यातील सामग्रीत पोर्टेबल जनरेटर, अन्नधान्य, पाणी शुद्धीकरणाच्या गोळ्या आणि डिग्निटी किट्सचा समावेश आहे. तसेच 11 सदस्यांचे डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि ‘टनेल रेस्क्यू’ तज्ज्ञांचे पथक नेपाळला रवाना झाले आहे. हिंदुस्थानने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवली आहेत.