प्रयागराजमध्ये मोठी दुर्घटना घडली, स्वामीनारायण मंदिराचा तीन मजली मागचा भाग खड्ड्यात कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शुक्रवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली.  येथील प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिराचा तीन मजली भाग बांधकामासाठी शेजारीच खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात अचानक कोसळला. सुदैवाने, ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात काही काळ प्रचंड घबराट पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वामीनारायण मंदिराच्या मागील बाजूला गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बांधकामाचे काम सुरू होते. या कामासाठी मंदिराला लागूनच एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव सध्या हे बांधकाम थांबवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अचानक मंदिराची मागचा भाग अचानक कोसळला. आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जॉर्जटाऊन पोलीस ठाण्याचे पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

ही दुर्घटना नेमकी कशी घडली, त्याचा शोध घेण्यासाठी सध्या प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, बांधकामासाठी खोदलेला खड्डा आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे मंदिराच्या पायाखालची माती खचली असावी आणि ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण समोर येईल. या घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून बांधकाम स्थळाच्या सुरक्षिततेची तसेच मंदिराच्या उर्वरित रचनेच्या मजबुतीची कसून तपासणी करत आहे.