
सोशल मीडियाच्या दुनियेत ओळख निर्माण केलेल्या 28 वर्षीय इन्फ्लुएन्सर मनजीत कौर हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मनजीत हिचे अपहरण करून तिला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून देण्यात आले होते. तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून पीजीआयएमईआर रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास महिनाभरापासून ती मृत्युशी झुंज देत होती. मात्र 26 ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. यामुळे चंदिगडसह संपूर्ण पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनजीतची आई कांता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 3 जुलै रोजी रात्री शुभी आणि पिंडा नावाच्या दोन ओळखीच्या व्यक्तींनी मनजीतला चंदिगढमधील सेक्टर 34 येथील एका दारूच्या दुकानाजवळ भेटण्यासाठी बोलावले. मनजीत तेथे पोहोचताच संशयित आरोपींना तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि थेट मोरिंडा येथे घेऊन गेले. तेथे तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर झाडाला घट्ट बांधून तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आले. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मनजीत आगीत होरपळत असताना तिथून जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत ब्लँकेटच्या मदतीने आग विझवली. त्यानंतर तिला तत्काळ मोरिंडामधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला आधी मोहाली आणि त्यानंतर * जुलै रोजी चंदिगढच्या पीजीआयएमईआर’ रुग्णालयात हलवण्यात आले.
अनेक आठवडे मनजीत बेशुद्ध अवस्थेत होती. 5 ऑगस्ट रोजी तिला काही वेळासाठी शुद्ध आली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार कुटुंबाला सांगितला. मात्र, गंभीर भाजल्यामुळे प्रकृती ढासळत गेली आणि 26 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. मनजीतच्या मृत्यूनंतर सेक्टर 34 पोलीस ठाण्यात भादवि कलम 140(1), 103(1)आणि 3(5) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मयत मनजीत ही घटस्फोटीत होती आणि तिला 7 वर्षांचा मुलगा आहे. ती मुख्य संशयितांपैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक शादी लाल यांनी दिली. सध्या पोलीस शुभी आणि पिंडा या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापे मारत आहेत. तसेच चंदिगढ ते मोरिंडा या मार्गावरील सीसीटीव्हीफुटेज तपासले जात असून तिचे नातेवाईक आणि मित्रांची चौकशी सुरू आहे.



























































