
अल्झायमरसारख्या आजारांची तपासणी करताना मेंदूच्या 86 अब्ज पेशींपैकी (न्यूरॉन्स) फक्त काही मोजक्याच तुकडय़ांची चाचणी केली जाते. मेंदूचा खूप मोठय़ा भागाची चाचणी करणे शक्य नसते. यावर उपाय म्हणून मानवी मेंदूच्या मुख्य भागाचा सेल्युलर लेव्हलवर म्हणजेच पेशींच्या पातळीवर जाऊन जगातील सर्वात सविस्तर थ्रीडी नकाशा बनवण्यात आला आहे. या डिजिटल नकाशाच्या मदतीने वैज्ञानिक मेंदूच्या पूर्ण MRI स्कॅनपासून थेट एका छोटय़ा पेशीपर्यंत झूम करून अगदी सहज पाहू शकतात. चेन्नईच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास मधील वैज्ञानिकांनी मेंदूच्या अभ्यासातील दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ‘अँकर’ (ANCHOR म्हणजेच अॅटलस ऑफ न्यूरोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ द ह्युमन ब्रेनस्टेम विथ 3D रीकन्स्ट्रक्शन) असं नाव असणाऱया या नकाशाद्वारे मेंदूच्या रचनेसोबतच मेडिकल इमेजिंग, ज्यातून संपूर्ण मेंदू एकत्र दिसतो आणि सेल्युलर पॅथॉलॉजी म्हणजे उतींची तपासणी ज्यातून मेंदूची एक-एक पेशी वेगवेगळी पाहता येते असे विज्ञानाचे दोन वेगवेगळे भाग एकमेकांशी जोडले गेले आहेत. कोणत्याही महागडय़ा मॉलिक्युलर तंत्रज्ञानाचा वापर न करता मायक्रोस्कोपच्या हाय-क्वालिटी फोटोंचा वापर करून हा नकाशा बनवला आहे. या 3D नकाशाद्वारे मेंदूच्या पेशींचे 200 हून अधिक समूह आणि मज्जासंस्थेचे मार्ग स्पष्टपणे ओळखता येतात.


























































