युक्रेनवर रशियाचा भीषण हल्ला; गोदामात स्फोट होऊन २७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनची राजधानी कीव्हजवळील बुचा जिल्ह्यातील मायला या गावात रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा रशियाने येथील एका गोदामावर हा हल्ला केला. या गोदामात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती, ज्यामुळे हल्ल्यानंतर तिथे साखळी स्फोट झाले आणि भीषण आग लागली. या आगीने आणि स्फोटांच्या धक्क्याने आजूबाजूच्या परिसराला मोठा विळखा घातला. या दुर्घटनेत मदत आणि बचावकार्य करत असताना दिमित्रिव्हका समुदायाचे प्रमुख तारास डिडिच यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. PTI ने यासंदभात वृत्त दिले आहे.

या भीषण हल्ल्यामुळे गोदामाच्या परिसरातील किमान ५० निवासी इमारती, एक रेस्टॉरंट आणि वृद्धाश्रम तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एका केअर होमचे मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील ३७० हून अधिक रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सलग तिसऱ्या दिवशी रशियाने कीव्ह आणि आजूबाजूच्या परिसरावर सातत्याने हवाई हल्ले सुरू ठेवल्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवासी क्षेत्राजवळ दारूगोळा साठवण्यास सक्त मनाई असतानाही तिथे स्फोटके कशी ठेवण्यात आली, याबद्दल त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. ज्यांच्या चुकीमुळे हा प्रसंग ओढवला आणि निष्पाप लोकांचे बळी गेले, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा देत झेलेन्स्की यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, युक्रेननेही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले केले असून रशियाच्या बेलगोरोड प्रांतात तीन तर क्रिमियामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे रशियन प्रशासनाने म्हटले आहे.