
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. राज्यातील पात्र मतदार यादीतून वगळले जाऊ नयेत आणि अपात्र व्यक्तींचा समावेश होऊ नये, यासाठी हरकती आणि तक्रारी नोंदवण्याची मुदत वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सध्या ही मुदत १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर अशी असून, ती आणखी चार आठवड्यांनी वाढवण्याची विनंती त्यांनी केली आहे.
रेवंत रेड्डी यांनी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत २.६५ कोटी अर्जांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यापैकी तब्बल ६०.५० लाख अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, तर ३२.३६ लाख अर्ज जुन्या मतदार यादीशी जोडले गेलेले नाहीत. परिणामी राज्यातील जवळपास ९२.८६ लाख मतदारांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे. यासोबतच सुमारे ४५.१९ लाख मतदारांची नोंद कायमस्वरूपी स्थलांतरित, अशी करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण होण्याची आणि लाखो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रोजगार किंवा विवाहानिमित्त वारंवार स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना नवीन पत्त्यावर नाव नोंदवण्यासाठी योग्य ती मदत मिळत नसल्याचा आक्षेप रेड्डी यांनी घेतला आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नावे जुन्या यादीतून वगळली जात आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव यादीत नसल्याचे मतदाराला समजणे हा नैसर्गिक न्यायाचा भंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोटीस मिळाल्यानंतर कागदपत्रे जमा करण्यासाठी स्थलांतरित कामगार, रोजंदारीवरील मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांना सध्या दिला जाणारा एक आठवड्याचा वेळ अपुरा असून, तो किमान ३ ते ४ आठवडे करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


























































