। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाच।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी मानसी श्रीहरी तोची पाहे।
जनी जाणता भक्त होऊनी राहे।
गुणी प्रीती राखे क्रमू साधनांचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाच।।

समर्थ म्हणतात- सदैव दक्ष अशा भगवंताला मनी- लोचनी, सगुण-निर्गुण रुपात रुजवा. तुमच्या दैवताची उपासना जाणतेपणाने करा. असा गुणी भक्त प्रेमाने, क्रमाक्रमाने नियमित साधना करीत राहतो. असा सर्वोत्तमाचा-ईश्वराचा दास जगात धन्यता पावतो. प्रस्तुत श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे उपासना करणारा, रामाचे रूप मनात असणारा, ध्यान, चिंतन, पूजा, सेवा अशा विविध भक्ती साधनाद्वारे आपल्या ईश्वराला भजणारा भक्त-सर्वोत्तम दास, म्हणजे वीर हनुमान.संत तुलसीदास हनुमान कोण होता हे आपल्या दोह्यात सांगतात, ‘जनी राम सेवा सरस, समुझी करब अनुमान, पुरुषा ते सेवक भए, हरत मे भे हनुमान।।’ श्रीराम सेवेतील परमानंद जाणल्याने ब्रह्मदेवाने, जांबुवंताचे रूप घेऊन सेवा केली, तर शिव भोलेशंकर -महादेव, हनुमान म्हणून रामाचे दास झाले. ‘तुलसी रामहू हे अधिक। राम भगत जिये जान। रिनिया राजा राम भये। धनिक भए हनुमान।।’ संत तुलसीदास म्हणतात, श्रीरामाला जाणताना रामभक्ताला अधिक जाणून घ्या. राजराजेश्वर श्री रामचंद्र स्वत एक ऋणी झाले आणि भक्त हनुमान त्यांचे साहुकार बनले. ‘मी तुझे ऋण कधीही फेडू शकत नाही,’ असे आपल्या दासाला म्हणणारे श्रीराम आणि रामचरणी समर्पित असलेले दास हनुमान दोघेही सर्वोत्तम! ? संध्या शहापुरे