मेडल द्या, मेडल द्या… वर्षा मॅरेथॉनमध्ये जेन अल्फाचा ठिय्या; ठाणे पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धकांचा संताप…. यापुढे सहभागी न होण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्याच्या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये आज संतापाचा भडका उडाला. स्पर्धेत धाव धाव धावूनही मेडल न मिळाल्याने जेन अल्फाने थेट व्यासपीठाच्या समोरच ठिय्या दिला. मेडल द्या.. मेडल द्या, अशा घोषणा देत या लहानग्या स्पर्धकांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी तसेच अन्य अधिकाऱ्यांसमोर बस्तान मांडले. त्यातच मॅरेथॉनच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्यभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांनी संताप व्यक्त करत यापुढे ठाण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार नाही, असा इशारा दिल्याने त्यांची समजूत काढताना सत्ताधारी शिंदे गटाची अक्षरशः भंबेरी उडाली. त्यामुळे ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचा विचका उडाल्याचेच पाहायला मिळाले.

एण्ट्री फी घेतली, मग पदक दिलेच पाहिजे

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांनी मॅरेथॉन कक्षात जाऊन आयोजकांना जाब विचारला. वाढत्या नाराजीचे रूपांतर काही वेळातच गोंधळात झाले. आम्ही या स्पर्धेला एण्ट्री फी दिली आहे त्यामुळे मेडल मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर स्पर्धक ठाम होते. दरम्यान १५ दिवसांनंतर मेडल देतो, असे आयोजकांनी सांगितल्यानंतर स्पर्धकांच्या संतापाचा बांधच फुटला. आता पुन्हा कधीही ठाण्यात स्पर्धेसाठी येणार नाही, असा इशारा आशिष पावस्कर या स्पर्धकाने दिला.

बाळ खेळाडूंच्या अपमानाचा शिवसेनेने केला निषेध

लहान मुलांच्या बाबतीत झालेला हा निष्काळजीपणा म्हणजे प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस आहे. मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या लहान मुलांनी स्पर्धा पूर्ण केली. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे या चिमुरड्यांना मेडलदेखील प्रशासनाला देता आले नाही. ही बाच ठाण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. हा ढिसाळ कारभार कोणामुळे झाला, याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केली आहे.

कोल्हापूरचा प्रवीण तर नाशिकची रविना प्रथम

या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात्त कोल्हापूरचा प्रवीण कांबळे तर महिला गटात नाशिकची रविना गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सुमारे २५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असल्याचा दावा प्रशासनाने केला.

  • ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ठाण्यासह राज्याच्या विविध भागांतून धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे खेळाडूंबरोबरच शाळकरी मुलांसाठीही ही स्पर्धा विशेष आकर्षण ठरते. यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मात्र स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मेडल वाटपाच्या गोंधळामुळे धावपटूंच्या उत्साहावर पाणी फिरले, अनेक स्पर्धकांनी अंतर पूर्ण करून शर्यत पार केली. धावण्याची कामगिरी पूर्ण झाल्यानंतर मेडल मिळेल, या अपेक्षेने स्पर्धक आणि शाळकरी मुले मेडल वितरणाच्या ठिकाणी पोहोचली. मात्र शेवटपर्यंत मेडलच मिळाले नसल्याने जेन अल्फा जनरेशनने व्यासपीठासमोर ठिय्या मांडला. ‘आम्हीही धावलो, मग आम्हाला मेडल का नाही,’ असा सवाल चिमुकल्या स्पर्धकांनी केला. मेडल देण्याबाबत आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.