आयएएस दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा, उत्तर प्रदेशच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश केडरच्या धडाडीच्या महिला सनदी अधिकारी ( आयएएस) दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रशासकीय सेवेतील 13 वर्षांच्या प्रदीर्घ आणि लक्षणीय प्रवासानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. त्यांच्या पोस्टमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरिया येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्या 2013 सालच्या आयएएस अधिकारी होत्या.  आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरू यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर दिव्या मित्तल यांनी लंडनमध्ये लाखोंच्या पॅकेजची नोकरी केली होती. मात्र, मातृभूमीची सेवा करण्याची प्रबळ इच्छा असल्याने त्यांनी ती आलिशान नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. कठीण परिश्रम करून त्यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत यश मिळवले.

सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना दिव्या मित्तल यांनी लिहिले, ‘मी किती मूर्ख होते! जे विचार करायचे की, मी या देशाला किंवा लोकांना काहीतरी द्यायला आले आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, या 13 वर्षांत मलाच लोकांकडून सर्वाधिक प्रेम, सन्मान आणि आपुलकी मिळाली. लोकांचे हे ऋण माझ्यावर आयुष्यभर राहील.’  दिव्या मित्तल यांनी अचानक राजीनामा का दिला, यामागचे नेमके प्रशासकीय किंवा वैयक्तिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.