
पूर्वांचलच्या वाराणसी, आझमगड आणि मिर्झापूर विभागांतील विविध जिह्यांमध्ये स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूचे 18 रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाराणसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. सिंग यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयांसह सर्व सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये खाटा राखीव ठेवण्याचे आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकाऱयांना रोग निगराणी वाढवून संशयित रुग्णांची माहिती तत्काळ सरकारी पोर्टलवर नोंदवण्यास सांगितले आहे.
– सध्या आढळलेल्या 18 रुग्णांपैकी सर्वाधिक 4 रुग्ण वाराणसीमध्ये आहेत. वाढता संसर्ग रोखण्यासाठी वाराणसीतील दोन मोठय़ा रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात महिलांसाठी 6, पुरुषांसाठी 6 आणि मुलांसाठी 12 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.




























































