वन विभागाच्या नाकावर टिच्चून ‘ओंकार’ची गोवा सफर, पुन्हा दोडामार्गात धडक; दुकानात घुसखोरीनंतर कळणे नदीपात्रात मांडले ठाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिलारी खोऱ्यातील पाळये, सोनावल, मोर्ले, केर, घोटगे या परिसरात वावरणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपातून बाहेर पडलेला ‘ओंकार’ नावाचा हत्ती पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थांची झोप उडवत आहे. दरम्यान, वन विभागाच्या नाकावर टिच्चून ओंकारने गोवा सफर करून पुन्हा दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला आहे. केळी आणि इतर खाद्याचे आमिष दाखवत वन कर्मचारी त्याला रस्त्यावरून पुढे नेत असताना आज आडाळी माऊली मंदिराच्या परिसरात एका दुकानात ओंकार चक्क आत शिरला आणि दुकानातील पिशवी उचलली. त्यानंतर हत्तीने कळणे नदीपात्रात ठाण मांडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कळपातील ‘बाहुबली’ हत्तीसोबत जमत नसल्याने गेल्या आठवडय़ात ओंकार कळपातून बाहेर पडला आणि सासोली, भिकेकोनाळ, कळणे, फोंडये, डिंगणे मार्गे थेट गोव्यातील मोपा (पेडणे) तालुक्यात दाखल झाला होता. मात्र, पेंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाने ओंकारला हुसकावून पुन्हा महाराष्ट्राच्या सीमेवर माघारी पाठवले. या प्रवासात चवताळलेल्या ओंकारने एका कारवर हल्ला चढवून तिचे नुकसान केले, तसेच डेगवे-दोडामार्ग ते बांदा मुख्य रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

ओंकारला पुन्हा एकदा मोरगाव, आडाळी, कळणे, भिकेकोनाळ मार्गे मोर्ले-केर दरम्यान असणाऱ्या मूळ कळपात सामील करण्यासाठी वन विभागाच्या पथकाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. ओंकार हत्ती याआधीही तीन वेळा बांदा, इन्सुली मार्गे गोवा प्रवास करून परतला आहे. बाहुबली आणि ओंकार यांच्यातील वादामुळे हत्तीचा हा उपद्रव सातत्याने वाढतो आहे. दरदिवशी होणाऱ्या या हत्तींच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, यावर तोडगा काढण्याची जोरदार मागणी परिसरातून होत आहे.  

नदीपात्रात मनसोक्त डुबक्या

ओंकारने दुकानात घुसखोरी केल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी शिताफीने त्याला कळणे गावाकडे आणले. भिकेकोनाळ, पुंब्रल, शिरवल, केर मार्गे त्याला मूळ कळपात नेण्याचे नियोजन असताना कळणे-उगाडे रस्त्यावर ओंकार थेट कळणे नदीच्या पात्रात उतरला. बरेच दिवस पाणी न मिळाल्यामुळे उकाडय़ाने त्रस्त झालेल्या ओंकारने नदीपात्रात तुंबून मनसोक्त डुबक्या मारल्या, सोंडेने झाडाच्या फांद्यांवर अंग घासून जलक्रीडेचा आनंद लुटला.