
वय अवघे 15 वर्षे, पण क्रिकेटची समज आणि निर्णयक्षमता मात्र थेट अनुभवी कर्णधाराला लाजवेल अशी. बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पूर्व विभागासाठी अचानक मिळालेली कर्णधारपदाची संधी गाजवली. नियमित कर्णधार इशान किशन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यानंतर वैभवने संघाची धुरा हाती घेतली आणि लगेचच डीआरएस घेत आर्यन जुयालची विकेट मिळवून दिली.
बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मध्य विभागाविरुद्धच्या सामन्यात 19 व्या षटकात इशान किशनच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर वैभवकडे नेतृत्व सोपवण्यात आले, तर कुमार कुशाग्राने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. कर्णधार म्हणून मैदानात उतरताच वैभवने 40 व्या षटकात मोठा निर्णय घेतला. मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर आर्यन जुयालच्या बॅटला चेंडू लागल्याचा संशय होता. गोलंदाज आणि यष्टिरक्षकही फारसे खात्रीशीर नसताना वैभवने अवघे तीन सेकंद शिल्लक असताना डीआरएस घेतला. अल्ट्राएजवर स्पष्ट स्पाइक दिसला आणि पंचांचा निर्णय बदलत जुयाल 46 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, हा वैभवच्या कारकीर्दीतील केवळ दुसरा दुलीप ट्रॉफी सामना आणि एकूण दहावा प्रथम श्रेणी सामना आहे. संघात अनुभवी खेळाडू असतानाही त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.




























































