मोठ्या गणेशोत्सव मंडळांना गर्दी नियंत्रणाची योजना बंधनकारक करणार! समन्वय समिती-पोलिसांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवामध्ये गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मोठ्या गणेशोत्सव मंडळांना गर्दी नियंत्रण योजना बंधनकारक करण्यात येणार आहे. यामध्ये विसर्जन मिरवणुका नियंत्रण, सीसीटीव्ही, प्रत्येक पोलीस विभागासाठी डिजिटल संपर्क यंत्रणा, अफवा रोखण्यासाठी पोलीस आणि मंडळामध्ये रॅपिड कम्युनिकेशन सेल, मंडळातील 10 ते 12 स्वयंसेवकांना प्रशिक्षण, हरवलेली मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेफ पॉइंट अशा उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलीस आयुक्तांसोबत आज बैठक पोलीस आयुक्तालयात पार पडली. या बैठकीत ऑनलाइन परवानगी, गर्दीचे नियोजन, मिरवणूक, वाहतूक, गर्दीच्या नियंत्रणासाठी यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना यावरही चर्चा झाली. या बैठकीला समन्वय समितीचे नरेश दहिबावकर, सुधीर साळवी, बाळासाहेब कांबळे, किरण तावडे, वासुदेव सावंत, उमेश नाईक, सतीश नायक, ओंकार सावंत, निखिल मोरये, सुधाकर पडवळ, भूषण मडव, गणेश गुप्ता, संजय शिर्पे, सिद्धेश खानविलकर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण कायदा 1986 प्रदूषण नियमन 2000 अंतर्गत आवाजाच्या मर्यादेबाबतचे नियम पाळावे लागणार आहेत. यानुसार सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत 55 डेसिबल, तर रात्री 10 नंतर 45 डेसिबल इतकी लाऊडस्पीकरची मर्यादा राहणार आहे.

महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ पॉइंट’ सुरू करावा लागेल. माहिला पोलीस हेल्पलाइन, छेडाछेडीचे प्रकार रोखण्यासाठी तक्रार व्यवस्था, महिला स्वयंसेवकांची नियुक्ती, प्रवेशद्वार व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रत्येक मंडळाला ‘हरवले सापडले’ अशी नियमावली तयार करावी लागेल.