श्रीकांतचा विजयारंभ; लक्ष्यचा लयभंग, सात्त्विक-चिरागचा दणदणीत विजय, तन्वीची दमदार कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू लक्ष्य सेनचा चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्याच लढतीत लयभंग झाला. नवव्या मानांकित कॅनडाच्या व्हिक्टर लायने लक्ष्यचा 21-14, 21-7 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. अवघ्या 38 मिनिटांत लक्ष्यला पराभवाचा धक्का बसला. लक्ष्यच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर किदांबी श्रीकांतच्या विजयारंभाने हिंदुस्थानला दिलासा मिळाला.

2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनकडून सामन्यात अनेक चुका झाल्या. त्याचा पुरेपूर फायदा उठवत व्हिक्टरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत लक्ष्यवर दबाव कायम ठेवला. गेल्या महिन्यातील विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या व्हिक्टरने लक्ष्यला पुनरागमनाची संधीच दिली नाही.

श्रीकांतचा 35 मिनिटांत विजय

लक्ष्यच्या निराशाजनक कामगिरीनंतर किदांबी श्रीकांतने हिंदुस्थानला दिलासा दिला. माजी अव्वल मानांकित श्रीकांतने चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीतील 21 व्या क्रमांकाच्या ची यू-रेनचा 21-16, 21-15 असा 35 मिनिटांत पराभव करत अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 34 व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने जूनमध्ये यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली होती. आता अंतिम 16 च्या लढतीत त्याच्यासमोर पुन्हा व्हिक्टर लायचे आव्हान असेल.

तन्वीचा झंझावात कायम

महिला एकेरीत हिंदुस्थानच्या तन्वी शर्माने आपली भन्नाट लय कायम ठेवली. जागतिक क्रमवारीतील 40 व्या क्रमांकाच्या डेन्मार्पच्या अमाली शुल्झचा 21-16, 21-17 असा पराभव करत तन्वीने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 26 व्या स्थानी असलेल्या तन्वीने गेल्याच महिन्यात तैपेई ओपनमधून पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले होते. आता तिच्यासमोर अंतिम 16 मध्ये जपानच्या नवव्या क्रमांकाच्या तोमोका मियाझाकीचे आव्हान असेल.

सात्त्विकचिरागचा दणका

जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या चौथ्या मानांकित जोडीनेही विजयी सलामी दिली. त्यांनी मलेशियाच्या जुनैदी आरिफ-कांग खाई झिंग जोडीचा 21-11, 21-16 असा 40 मिनिटांत पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये सामना 16-16 असा रंगला होता, मात्र निर्णायक क्षणी सात्त्विक-चिरागने सलग पाच गुण जिंकत सामना खिशात घातला. अंतिम 16 मध्ये त्यांची गाठ फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्ह-टोमा ज्युनियर पोपोव्ह यांच्याशी पडणार आहे.

ध्रुवतनीषाची सहज आगेपूच

मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनीषा क्रास्टो या हिंदुस्थानी जोडीने थायलंडच्या टोनकिड साएहेंग-टोनरुग साएहेंग जोडीचा अवघ्या 24 मिनिटांत 21-8, 21-9 असा धुव्वा उडवला. अंतिम 16 मध्ये हिंदुस्थानी जोडीपुढे चायनीज तैपेईच्या लियू पुआंग हेंग-हसू यिन हुई जोडीचे आव्हान असेल. या जोडीने फ्रान्सच्या थॉम गिकेल-डेल्फिन डेलरू यांना पराभूत केले.

देविका, रोहनरुथविकाचे आव्हान संपले

दरम्यान, हिंदुस्थान देविका सिहागला महिला एकेरीत बल्गेरियाच्या कालोयाना नलबांतोव्हाने 21-18, 21-15 असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत रोहन कपूर-रुथविका शिवानी गड्डे हिंदुस्थानी जोडीला चायनीज तैपेईच्या वू गुआन शुन-ली चिया शिन जोडीकडून 21-16, 21-18 असा पराभव स्वीकारावा लागला.