निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिरचे सीईओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले सीईओ म्हणून सेवानिवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रस्टच्या वतीने आज यासंदर्भात घोषणा करण्यात आली. मिश्रा यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे नेतृत्व केले होते.

श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभर वादळ उठले  होते. त्यानंतर 2 जुलै रोजी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता. चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर सेवानिवृत्त परराष्ट्र सचिव कृष्ण मोहन यांना कार्यवाहक सरचिटणीस बनविण्यात आले होते. आता जितेंद्र मिश्रा यांची सीईओ म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टमध्ये 3 नवे सदस्यदेखील सामील करण्यात आले आहेत. त्यात दिल्लीतील महेश भागचंदका, अयोध्येतील अॅड. मदन मोहन पांडे आणि शिकोहाबाद येथील आरएसएस समर्थक निर्मला यादव यांचा समावेश आहे. निर्मला यादव या ट्रस्टच्या पहिल्या महिला विश्वस्त आहेत. मदन मोहन पांडे हे बाबरी मशीद खटल्यात रामलल्लाच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांमध्ये सहभागी होते. तर महेश भागचंदका हे दिल्लीतील व्यावसायिक असून विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांचे नातेवाईक आहेत.