
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेआधी हिंदुस्थानी संघाच्या ‘अ’ संघाची जोरदार तयारी रंगणार आहे. हिंदुस्थान ‘अ’ संघ न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध तीन चारदिवसीय सामने खेळणार असून 24 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान ही मालिका होणार आहे. विशेष म्हणजे, हे सामने हिंदुस्थानच्या न्यूझीलंड दौऱ्यातील पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसोबतच सुरू राहणार आहेत.
हिंदुस्थानचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यात पाच टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने होणार असून ही मालिका 15 नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्याचवेळी हिंदुस्थान ‘अ’ संघ न्यूझीलंडमध्ये चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कसोटीची पूर्वतयारी करणार आहे.
कसोटीआधी तीन ‘कसोटय़ा’
हिंदुस्थान ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यातील तीन सामन्यांचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. पहिला सामना 24 ते 27 ऑक्टोबरदरम्यान लिंकनमध्ये, दुसरा सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान ख्राईस्टचर्चमध्ये, तर तिसरा सामना 7 ते 10 नोव्हेंबरदरम्यान लिंकनमध्ये होणार आहे. यानंतर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील मुख्य कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 19 ते 23 नोव्हेंबरदरम्यान वेलिंग्टन, तर दुसरी कसोटी 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.
रणजीला फटका; ‘अ’ संघातील खेळाडूंची थेट परदेशवारी
या मालिकेचे वेळापत्रक मात्र दोन्ही देशांच्या स्थानिक क्रिकेटशी धडकले आहे. हिंदुस्थानात 11 ऑक्टोबरपासून रणजी करंडक सुरू होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंना आपल्या राज्य संघांकडून रणजी सामने खेळता येणार नाहीत. न्यूझीलंडमध्येही अशीच परिस्थिती आहे. पर्ह्ड ट्रॉफी ही एकदिवसीय स्पर्धा 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान होणार असून त्यानंतर 19 नोव्हेंबरपासून प्रथम श्रेणीतील प्लंकेट शील्ड स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
डब्ल्यूटीसीच्या गणितासाठी मालिका महत्त्वाची
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी ‘अ’ मालिकेला विशेष महत्त्व आहे. आगामी कसोटी मालिकेपूर्वी परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि संभाव्य खेळाडूंना संधी देण्यासाठी ही मालिका निर्णायक ठरणार आहे. विशेषतः जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेच्या दृष्टीने हिंदुस्थान-न्यूझीलंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत न्यूझीलंड सध्या तिसऱ्या स्थानी, तर हिंदुस्थान पाचव्या स्थानी आहे.
























































