रशियन सैन्यात भरती झालेल्या 51 हिंदुस्थानींचा मृत्यू, बेरोजगारी वाढल्याने नोकरीसाठी परदेशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियन सशस्त्र दलात भरती झालेल्या 227 हिंदुस्थानी नागरिकांपैकी 139 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर 51 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली आहे. हिंदुस्थानात नोकरी न मिळाल्याने हे तरुण नोकरीसाठी रशियात गेले होते. रशियन सैन्यात अद्याप सेवा बजावत असलेल्या उर्वरित हिंदुस्थानी नागरिकांची लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी रशियासोबत चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किर्गिझस्तान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत रशियन सैन्यात सेवा बजावत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मिस्त्री यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थानी नागरिकांची रशियन सशस्त्र दलात भरती करण्यात आल्याचा मुद्दा हिंदुस्थानने रशियासोबत वेगवेगळ्या स्तरांवर आणि विविध प्रसंगी उपस्थित केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मॉस्कोतील हिंदुस्थान दूतावास सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उर्वरित हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यासाठी दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे हिंदुस्थानी तरुण अद्याप रशियन सैन्यात आहेत त्यांना रशियन सेवेतून मुक्त करून त्यांच्या कुटुंबीयाकडे परत आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे मिस्त्री म्हणाले.