
मुंबईतील हवा प्रदूषण आणि धुळीला आळा घालण्यासाठी महापालिकेची स्मार्ट यंत्रणा कार्यरत झाली आहे. महापालिकेचे ‘द सक्शन प्रिंकलर मल्टीपर्पज व्हेईकल’ मुंबईच्या रस्त्यांवर उतरले आहे. ही वाहने केवळ धूळ शोषून घेणारी नाहीत, तर रस्ते धुण्यापासून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पाणी देण्याचेही काम करतील. या बहुउद्देशीय सक्शन स्प्रिंकलर गाड्या टप्प्याटप्प्याने पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
सध्या सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे आणि वाढत्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन हवेची गुणवत्ता खालावत असते. पारंपरिक पद्धतीने झाडू मारल्याने धूळ हवेतच उडते. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘द सक्शन स्प्रिंकलर मल्टीपर्पज व्हेईकल’ हे आधुनिक बहुउद्देशीय वाहन ताफ्यात समाविष्ट केले आहे.
या वाहनांमध्ये बसवलेल्या मिस्टिंग गन्सद्वारे हवेत पाण्याचे अतिसूक्ष्म तुषार फवारले जातात. यामुळे हवेत तरंगणारे धुळीचे कण जड होऊन जमिनीवर बसतात. वाहनाचे सक्शन चेंबर भरल्यानंतर गोळा झालेली धूळ वेस्ट कलेक्शन व्हॅनद्वारे थेट ‘डेब्रिज प्रोसेसिंग सेंटर’कडे रिसायकलिंगसाठी पाठवली जाते. ही कामे ऑटोमॅटिक होणार आहे.
हिवाळ्यात प्रभावी यंत्रणा
हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे. पालिकेकडे सध्या पाच वाहने असून (एफ उत्तर, आर सेंट्रल, एम पूर्व, पी पश्चिम आणि एच पूर्व विभागात) लवकरच आणखी वाहने दाखल होत आहेत. मुंबईभरात अशी एकूण 29 आधुनिक वाहने तैनात केली जाणार आहेत.
रस्त्यावरील पाच प्रमुख कामे एकाच वेळी पार पाडणारे हे बहुउद्देशीय यंत्र आहे. यात 3 ते अतिसूक्ष्म धूलिकण सहज ओढून घेण्याची क्षमता असल्याने हवेची शुद्धता राखण्यास मोठी मदत होते. याशिवाय हे वाहन रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता व धुलाई करण्यासोबतच मुख्य रस्त्यांची थेट धुलाईदेखील करते.
वाहनाचे बहुउद्देशीय फायदे
सूक्ष्म धूलिकण नियंत्रण: 3 ते 50 मायक्रोनपर्यंतचे बारीक धूलिकण ओढून घेणे.
दुभाजक स्वच्छता: रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता व धुलाई.
फॉगिंग व मिस्टिंग: हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी धुके फवारणी.
झाडांची निगा: रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पाणी देणे.
रस्त्यांची धुलाई: मुख्य रस्त्यांवरील धूळ धुऊन काढणे.


























































