
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील संपदा मुंडे या तरुण डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. डॉ. रूपनवर यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी आज फलटणमध्ये आंदोलन केले. तसेच माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे नागरिकांनी फलटण-पंढरपूर महामार्ग रोखून धरला.
डॉ. रूपनवर आत्महत्या प्रकरणात आपण एका माजी मंत्र्याचे पीए असल्याचे सांगणाऱ्या प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख याचे नाव पुढे आले आहे. शस्त्र परवान्यासाठी नियमबाह्य फिटनेस प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे प्रसाद कोंडे-देशमुख याने डॉ. रूपनवर यांना धमकावल्याचा व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डॉ. रूपनवर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने डॉ. रूपनवर यांचेच वेतन रोखले आणि अंतर्गत चौकशी लावून छळ केला. या त्रासाला कंटाळून डॉ. रूपनवर यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन रेल्वे स्थानकाजवळील उच्च दाब टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सायन रुग्णालयात उपचारांदरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
…तर रुग्णालयासमोर अंत्यसंस्कार करू!
‘जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करू,’ अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. ‘मार्ड’ संघटनेनेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, कामाच्या ठिकाणी डॉक्टरांच्या होणाऱ्या मानसिक छळाविरोधात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
























































