
दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव पुंज मुख्यालयाबाहेत आज काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी ‘मनुस्मृती’ ग्रंथ आणि संघाच्या प्रतीकात्मक गणवेशाचे दहन करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच काँग्रेसच्या राष्ट्रीय असंघटित कामगार विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदित राज यांना ताब्यात घेतले.
उत्तराखंडमधील हद्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर त्या मैदानावर भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेवर टीका केल्याने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला. त्यावरून वादाला तोंड फुटले असून काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यालयावर धडक दिली.
मुंबईतही निदर्शने
मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत तीव्र निषेध नोंदवला. भाजपच्या कार्यालयावर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते, मात्र कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.



























































