
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत आधी पारदर्शक माहिती द्या; मगच पुनर्विकासासाठी संमती देऊ, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. अभ्युदय नगरचा पुनर्विकास हा रहिवाशांच्या हिताचा आणि कायदेशीर संरक्षणाचा असावा तसेच सर्व अटी, भाडे, कॉर्पस फंड आणि आर्थिक सुरक्षितता स्पष्ट झाल्याशिवाय संमती दिली जाणार नाही, असे दोन प्रमुख ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाच्या म्हाडाच्या जाचक व अन्यायकारक संमतीपत्राविरोधात (कन्सेन्ट) रविवारी काळाचौकी येथील समाजमंदिर हॉल येथे रहिवाशांची जाहीर सभा पार पडली. या सभेला विविध पक्षीय स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पक्षीय झेंडे बाजूला ठेवून आपण एक रहिवासी म्हणून पुनर्विकासाचा हक्काचा लढा लढणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु रहिवाशांना अंधारात ठेवून, ना सॅम्पल फ्लॅट दाखवता ना थ्रीडी सादरीकरण (प्रेझेंटेशन) देता अर्धवट कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप रहिवाशांनी केला. जोपर्यंत सुधारित मसुदा आणि सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा ठाम निर्धार या सभेत करण्यात आला. गणेशोत्सवापूर्वी व्यापक सभा आयोजित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
४० हजार रुपये भाडे, २५ लाख कॉर्पस फंड द्या पुनर्विकासाची संपूर्ण माहिती आणि अटी रहिवाशांसमोर स्पष्टपणे मांडाव्यात, रहिवाशांना दरमहा ४० हजार रुपये घरभाडे आणि २५ लाख रुपयांचा कॉर्पस फंड द्यावा, प्रकल्पाची स्पष्ट कालमर्यादा, विकासकाच्या जबाबदाऱ्या आणि सुरक्षित ‘बँक गॅरंटी’ अत्यंत स्पष्ट असावी, म्हाडाच्या मसुद्यातील जाचक अटी तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली.



























































