
निवडणूक आयोगाला ‘व्होट चोरी आयोग’ म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भाजप व आयोगाच्या मिलिभगतवर जोरदार हल्ला चढवला. ‘भाजप आणि आयोगाने कामाचा पॅटर्न बदलला आहे. यापुढेही तो बदलत राहणार आहे. भाजपचा विजय आणि हिंदुस्थानच्या लोकशाहीचा अंत हाच त्यांचा हेतू आहे,’ असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांची नावे मतदारयादीतून उडवण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मतचोरीच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. ‘महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 39 लाख मतदार जोडले गेले होते. आता 2.07 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. म्हणजे प्रत्येक पाचवा मतदार बाद करण्यात आला आहे. या विरोधाभासाकडे लक्ष वेधत ही मतचोरीच होती, असे राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रातील 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळची आणि आताच्या एसआयआर नंतरची एकूण मतदारांची आकडेवारीही राहुल यांनी पोस्ट केली आहे. त्यात मोठी तफावत आहे. यापैकी कोणती आकडेवारी खरी, असा सवाल राहुल यांनी केला आहे.
कोणती यादी योग्य?
लोकसभा 2024 9.29 कोटी
विधानसभा 2024 9.7 कोटी
एसआयआर 7.78 कोटी
बंगालमध्ये 10 पैकी 9 नावे
चुकीच्या पद्धतीने बाद केली!
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या एसआयआर प्रक्रियेत जी नावे वगळण्यात आली, त्यातील 91 टक्के नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावी लागणार आहे. याचा अर्थ 10 पैकी 9 नावे चुकीच्या पद्धतीने कापली गेली होती. निवडणूक झाल्यानंतर आता ही नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट केली जाणार आहेत. ही सुद्धा मतचोरीच होती. आजही मी त्या आरोपावर ठाम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
मतचोरी करून आलेल्या सरकारला जनतेची काही गरज नाही. हेच कारण आहे की भाजप लोकांचं ऐकत नाही. त्यांच्या मताला किंमत देत नाही.


























































