
कोकणात गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे, गोवा कोल्हापूर आदी विविध शहरांमध्ये कामानिमित्त गेलेले चाकरमानी गावाकडे येत असतात. गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. संगमेश्वरातील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यासाठी सज्ज झाले असून ते आपल्या पारंपारिक कामात गुंग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
गणेशोत्सव काळात कोकणात भजन, किर्तन, जाकडी, टिपऱ्या आरत्या असे पारंपारिक कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी सुरू असतात. काही ठिकाणी भजनाचे डबलबारी सामने तर जाकडीतील शक्ती तुरीवालेचे जंगी सामने पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक भजन जाखडी मंडळे आपल्याकडील वाद्य साहित्यास उत्तम नाव यावा व कार्यक्रमाची रंगत वाढावी या उद्देशाने तबला, ढोलकी आदी वाद्ये खरेदीसाठी किंवा त्यावर नवा साज चढविण्यासाठी नजीकच्या वाद्य कारागिरांकडे गर्दी करीत आहेत. त्यामुळे वाद्य कारागिरांची मोठी धावपळ होत आहे. ही धावपळ होऊ नये यासाठी एक महिना अगोदरच हे वाद्य कारागिर आपल्या कामाला जोर धरतात. या वर्षीचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येत असून तालुक्यातील संगमेश्वर येथे तबला, ढोलकी मदंगाची खोडे, आदिच्या किंमती वाढल्या असल्याचे दिसून येत आहे .


























































