पिक-अप गाडीची उभ्या ट्रकला धडक; अपघातात 6 भाविक ठार, 14 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिक-अप गाडीने रस्त्यावरील उभ्या ट्रकला धडक दिल्याने अपघातात सहा भाविक ठार झाले तर 14 जण जखमी झाले. मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास हरियाणातील पलवल जिल्ह्यात कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले आहे.

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व भाविक राजस्थानमधील खाटू श्याम मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना भेट देऊन परतत होते. उत्तर प्रदेशातील वृंदावनकडे जात असताना त्यांची पिक-अप गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमींना उपचारासाठी पलवलमधील रुग्णालयात नेण्यात आले, तर सहा मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. विजय (75), राजकुमार (40), रेश्मा (45), कमला (65), सुधा (52) आणि महेश (60) अशी मयतांची नावे आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.