नेपाळमधील आपत्तीनंतर सिक्कीमने 16 अति-धोकादायक सरोवरांवर बसवले सेन्सर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी विध्वंसानंतर आता सिक्कीममध्ये 16 अति-संवेदनशील हिमसरोवरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सरोवराचे पाणी पातळीतील बदल ओळखण्यासाठी सेन्सर्स, स्वयंचलित हवामान केंद्रे व पूर्व-सूचना प्रणाली बसवल्या आहेत, अशी माहिती सिक्कीमचे राज्य मदत आयुक्त रिंझिंग चेवांग यांनी सोमवारी दिली. नेपाळमध्ये हिमसरोवरांशी संबंधित विनाशकारी आपत्ती ओढवल्यानंतर, सिक्कीमने ‘ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड’ धोक्यांचे व्यवस्थापन करण्याचा आपला अनुभव नेपाळसोबत सामायिक करण्याची तयारी दर्शवली आहे.

सिक्कीममध्ये लहान-मोठी मिळून 400 हून अधिक हिमसरोवरे आहेत. त्यापैकी 16 सरोवरांची ओळख राज्याच्या अति-संवेदनशीलता मूल्यांकनांतर्गत करण्यात आली आहे. यापैकी 13 सरोवरे उत्तर सिक्कीममध्ये आणि 3 पश्चिम सिक्कीममध्ये आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी 16 सरोवरे अति-संवेदनशील आहेत, असे चेवांग म्हणाले. त्यांच्या मते, राज्याने या सरोवरांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि पाण्याच्या साठ्यात व पातळीत होणारे बदल टिपण्यासाठी बहुतेक संवेदनशील ठिकाणी सेन्सर्स बसवले आहेत. याबाबत अधिक बोलताना चेवांग म्हणाले, “आम्ही सरोवरांवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि हिमसरोवरातील पाण्याचे प्रमाण वाढत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही बहुतेक सरोवरांमध्ये सेन्सर्स बसवले आहेत,” असे ते म्हणाले.

पूर्व-सूचना प्रणाली आणि स्वयंचलित हवामान केंद्रे बसवून देखरेख नेटवर्क अधिक बळकट करण्यात आले आहे. विशेषतः उत्तर सिक्कीममध्ये, जिथे बहुतेक संवेदनशील सरोवरे स्थित आहेत. “उत्तर सिक्कीममधील अनेक ठिकाणी, जिथे प्रामुख्याने सरोवरे आहेत, तिथे आम्ही पाणी पातळीतील वाढीची माहिती मिळवण्यासाठी ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम्स’ (पूर्व-सूचना प्रणाली) आणि स्वयंचलित हवामान केंद्रे बसवली आहेत,” असे चेवांग यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार विशेषतः संवेदनशील आणि सखल भागांवर लक्ष केंद्रित करत असून, जिथे आवश्यक असेल तिथे पुनर्वसनाची कार्यवाहीही केली जात आहे. “आम्ही विशेषतः संवेदनशील असलेल्या भागांसाठी – ज्यामध्ये सखल भागांचा समावेश आहे – उपाययोजनांवर काम करत आहोत आणि जिथे आवश्यक असेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारीही करत आहोत.