
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा आर्थिक विकास दर 7.8 टक्के झाल्याचे म्हणत स्वत:च्याच सरकारची पाठ थोपटून घेतली. मंगळवारी एक व्हिडीओ शेअर करत मोदींनी जीडीपीबाबत माहिती दिली. मोदींच्या या व्हिडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ म्हणजे अर्थव्यवस्थेवरील केवळ पीआर स्टंट असून, देशातील परिस्थिती म्हणजे लाइट्स, कॅमेरा आणि इनॲक्शन अशी आहे, अशी टीका खरगे यांनी केली.
मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींच्या जीडीपी वाढीवरील दाव्याची चिरफाड केली. तसेच देशात लोकांशी खोटे बोलण्याच्या तुमच्या क्षमतेव्यतिरिक्त काहीही बदललेले नाही, असे म्हणत खरगे यांनी मोदींवर हल्ला चढवला. देशातील जनता अभूतपूर्व बेरोजगारी, असह्य महागाई आणि बेलगाम आर्थिक विषमतेत अडकली असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले.
Lights. Camera and INACTION
This is the story of Modi ji’s PR when it comes to the Economy.
.@narendramodi ji,
You are saying that the country is celebrating GDP Growth.
You may have that luxury, but the Aam Aadmi does NOT!
Our Common people are burdened by 3 ‘U’s and YOU…
— Mallikarjun Kharge (@kharge) September 1, 2026
अभूतपूर्व बेरोजगारी
देशातील बेरोजगारी 50 वर्षांतील उच्चांकावर असून 40 टक्के तरुण पदवीधर बेरोजगार आहेत. जुलै 2026 मधील आकडेवारीनुसार 15 ते 29 वयोगटातील दर सहा पैकी एक तरुण बेरोजगार आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे दिलेले आश्वासन पूर्णपणे हवेत विरले आहे.
असह्य महागाई
किरकोळ महागाई 19 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. साखर, कांदा, टोमॅटो, डाळ, तेल, तांदूळ आणि दूध यांसारख्या रोजच्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या किमतींमुळे मध्यमवर्गीय त्रस्त तर गरीब हवालदिल झाला आहे.
बेलगाम आर्थिक विषमता
देशातील विषमता ब्रिटिशांच्या काळापेक्षाही भीषण झाली आहे. देशातील अव्वल 1 टक्के श्रीमंतांकडे तब्बल 40 टक्के संपत्ती जमा झाली आहे, तर तळातील 50 टक्के जनता अवघ्या 15 टक्के संपत्तीवर जगण्यास भाग आहे.
उद्योगपतींना कर्जमाफी
मोदी सरकारने 2014 पासून बड्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज माफ केल्याचा आरोप खरगे यांनी केला. 22006 कोटींच्या कर्जाची 6.5 कोटीत सेटलमेंट करत 99.97 टक्के रकमेवर पाणी सोडल्याचे उदाहरण देत खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान आपल्या मर्जितील मित्रासाठी वैयक्तिक ट्रॅव्हल एजंट म्हणून करत असल्याचेही दिसले आहे. पण देशवासियांनी सोने खरेदी करू नये, परदेशवारी करू नये असे उपदेश तुम्ही देतात आणि हेच वास्तव स्थिती दर्शवतात, असा टोलाही खरगे यांनी लगावला.


























































