
कल्याण न्यायालय परिसरात धामण दिसताच सर्वांची पळापळ झाली. अखेर वॉर फाऊंडेशनच्या तरुणींनी धामणला पकडले आणि सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सापाला पकडल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
कल्याण कोर्ट परिसरात साप असल्याची माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनच्या वन्यजीव बचाव पथकातील साक्षी दहिवळकर आणि धनश्री परब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणत्याही प्रकारे सापाला इजा न पोहोचवता सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर वॉर फाऊंडेशनच्या सदस्यांनी तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सापांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली. साप हा निसर्गातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून परिसरात साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी तत्काळ प्रशिक्षित वन्यजीव बचावकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पथकातील सदस्यांनी केले.





























































