
राठी रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर ३४ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाग्यश्री नाईक असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी डॉ. परमेश राठी यांच्या विरोधात भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यश्री या मागील तीन महिन्यांपासून राठी रुग्णालयात नियमित उपचार व वैद्यकीय तपासणी करून घेत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जून रोजी डॉ. परमेश राठी यांनी भाग्यश्री नाईक व त्यांच्या कुटुंबीयांना पोटात बाळ फिरले असल्याचे सांगून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले. त्यानंतर त्यांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सिझेरियन प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी परमेश राठी यांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच भाग्यश्री यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, ठाणे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मयत महिलेचे पती हरिसिंग नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात डॉ. परमेश राठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भाईंदर पोलीस ठाण्याकडून सुरू असून वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे तसेच पोलीस अंमलदार ललित धोंडगे यांनी केली आहे.






























































