नेपाळमधील महापुरातल्या मृतांची संख्या 1 हजारावर, 4 हजार लोक अद्याप बेपत्ता; पुन्हा पुराचा अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमधील महाप्रलय येऊन आज सात दिवस झाले. पुरामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या महाप्रलयात आतापर्यंत 1, 003 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप 4 हजार बेपत्ता आहेत. अद्याप पाणी, ढिगारे आणि चिखलात शोध मोहीम सुरू आहे. सततच्या पावसामुळे बचाव आणि मदत कार्यांमधील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. आधीच नेपाळमधील परिस्थिती भीषण असताना इतर भागांमध्ये नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नवीन समस्या निर्माण होत आहेत. अनेक भागांमध्ये नद्यांना पुन्हा पूर आल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा पुराचा इशारा जारी केला आहे.

पूर्व, मध्य आणि पश्चिम नेपाळच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी, लहान-मोठ्या नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. नुवाकोट आणि रसुवा येथे अचानक पूर येण्याचा सर्वाधिक धोका आहे, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

काठमांडू, ललितपूर, भक्तपूर, सिंधुपलचौक, गोरखा, लमजुंग आणि कैलालीसह दोन डझनांहून अधिक जिल्ह्यांतील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना नद्या आणि ओढे टाळण्याचे आणि गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

कोसी, नारायणी, बागमती, कर्नाली आणि महाकाली यांसारख्या प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी आणि प्रवाहावर चोवीस तास देखरेख ठेवली जात आहे. रसुवाच्या तिमुरे परिसरात रिअल-टाइम सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे सीमेवरून येणाऱ्या पाण्याच्या वेगावर लक्ष ठेवत आहेत. ही प्रणाली हवामान इशारा नेटवर्कशी जोडण्यात आली आहे, जेणेकरून पाण्याची पातळी अचानक वाढल्यास लोकांना वेळेवर सतर्क करता येईल.

नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी आठ जिल्ह्यांमधून 1,003 मृतदेह बाहेर काढले आहेत. यापैकी चितवन जिल्ह्यात सर्वाधिक 321 मृत्यू झाले आहेत. यानंतर, नवलपरासी पूर्वमध्ये 216, नवलपरासी पश्चिममध्ये 170, नुवाकोटमध्ये 95, गोरखामध्ये 65, धादिंगमध्ये 57, रसुवामध्ये 41 आणि तनहुनमध्ये 38 मृतदेह सापडले.

बेपत्ता लोकांच्या संख्येतही वाढ होत असून, यामध्ये 583 परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे सैनिकांना पूरग्रस्त भागांपर्यंत पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.