अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; संजूसह बुमराची संघात एंट्री, रिंकू आऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे, तर रिंकू सिंगसह आठ खेळाडूंना वगळण्यात आले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराह एकही सामना खेळलेला नाही. पण तो फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच खेळू शकेल. तीन सामन्यांची ही मालिका 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. 

संजू सॅमसन पुन्हा संघात दाखल

झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान टी-20 संघातून वगळण्यात आलेला संजू संघात परतला आहे. टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानच्या विजयाचा नायक संजू होता. पण आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले होते, पण तोही अपयशी ठरला. झिम्बाब्वे दौऱ्यात वैभवच्या बॅटने दमदार कामगिरी केली होती आणि त्याला ‘मालिकावीर’ म्हणूनही गौरविण्यात आले होते. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठीही वैभवची निवड झाली आहे.

चार खेळाडूंच्या फिटनेस चाचण्या बाकी

अफगाणिस्तान मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघात चार खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांच्या फिटनेस चाचण्या बाकी आहेत. या खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. हे खेळाडू मालिकेपूर्वी फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच खेळण्यास पात्र ठरतील. हर्षित आणि नितीश हे दोघेही बऱ्याच काळापासून दुखापतग्रस्त आहेत. दुखापतीमुळे सुंदरलाही श्रीलंकेला प्रवास करता आला नाही.

रिंकूसह आठ खेळाडू वगळले

हिंदुस्थानी संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी असलेल्या रिंकू सिंगसह प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंग आणि हर्ष दुबे यांना वगळण्यात आले आहे. त्या दौऱ्यात यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांनी हिंदुस्थानसाठी पदार्पण केले. झिम्बाब्वे दौऱ्यात प्रिन्स यादव जखमी झाला होता.

हिंदुस्थानचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.