मुंबई महापालिकेत बदल्यांचे ‘रेट कार्ड’, भाजप आमदाराची मुख्य सचिवांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका अभियंत्यांच्या बदल्यांत पुन्हा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे घेऊन अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचा ‘रेट कार्ड’च आपल्याकडे असल्याचा दावा भाजप आमदाराने करत राज्याच्या  मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. तसेच यासंदर्भातील माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. कोटेचा यांच्या आरोपानुसार, तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी 2026 मध्ये 165 अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या.  मोठय़ा प्रमाणात पैसे घेऊन या बदल्या झाल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या  बदल्या रद्द केल्या. मात्र यातील 50 टक्के अभियंत्यांच्या बदल्यांचा नवा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती कोटेचा यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना 15 मे 2026 रोजी पत्राद्वारे दिली. त्यानंतर ही यादी रद्द करण्यात आली. त्यानंतर दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला. या बदल्यांचे ‘रेट कार्ड’  आपल्याकडे असल्याचाही दावा मिहीर कोटेचा यांनी केला आहे.

या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी मिहीर कोटे यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी अतिरिक्त आयुक्त  अविनाश ढाकणे यांच्याकडे विशिष्ट माहितीची मागणी केली होती.

माहिती देण्यास टाळाटाळ 

5 ऑगस्ट रोजी मागितलेल्या माहितीला अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी 26 दिवस उलटूनही उत्तर दिलेले नाही. मागितलेली माहिती मिळाल्यास ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार उघड होईल, असा कोटेचा यांचा दावा आहे.  कोटेचा यांनी  मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे तक्रार केली आहे.