
डॉ. लक्ष्मीप्रिया आर.
मुलाला ताप येणे हे पालकांनी डॉक्टरांकडे जाण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या आजारांची सुरुवात अनेकदा सारख्या लक्षणांनी होते आणि साध्या व्हायरल तापासारखीही वाटू शकते. मात्र, काही मुलांची तब्येत अगदी कमी वेळात गंभीर होऊ शकते. त्यामुळे धोक्याची लक्षणे ओळखणे आणि आजाराच्या योग्य टप्प्यावर योग्य प्रयोगशाळेची टेस्ट करून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
डासांमुळे होणाऱ्या संसर्गांचे निदान करताना एक मोठे आव्हान म्हणजे सुरुवातीच्या काळातील लक्षणे एकमेकांसारखी असतात. तापासोबत डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, मळमळ, उलट्या किंवा भूक कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. फक्त क्लिनिकल लक्षणांवरून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया किंवा इतर संसर्गांमध्ये नेमका फरक करणे नेहमीच शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टरांना गरज वाटल्यास लॅबोरेटरी टेस्टद्वारे आजाराची खात्री करणे महत्त्वाचे ठरते.
ताप सतत राहत असेल, विशेषतः त्यासोबत तीव्र डोकेदुखी, खूप अंगदुखी, वारंवार उलट्या, पोटात अस्वस्थता किंवा दुखणे, अंगावर पुरळ, नेहमीपेक्षा जास्त झोप येणे, चिडचिड होणे किंवा पुरेसे द्रव पदार्थ न घेणे अशी लक्षणे असतील तर पालकांनी मुलाची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. याशिवाय पोटात खूप तीव्र दुखणे, सतत उलट्या होणे, नाक किंवा हिरडयांमधून रक्त येणे, उलटी किंवा शौचातून रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खूप अशक्तपणा जाणवणे, हातपाय थंड किंवा फिकट पडणे, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा शुद्धी/भान बदलणे ही गंभीर लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसत असतील तर मुलाला घरी ठेवून फक्त निरीक्षण करत राहणे योग्य नाही.
डेंग्यूमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताप कमी होऊ लागतो त्याच काळात मुलाची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे ताप कमी झाला म्हणजे आजार बरा होत आहे, असे पालकांनी समजू नये. शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित होत गेल्यानंतर dengue IgM antibody testing अधिक उपयोगी ठरते.
एक सामान्य गैरसमज असा आहे की, तापाच्या सुरुवातीच्या दिवसांत platelet count नॉर्मल असेल तर डेंग्यू नाही असे मानले जाते, पण असे नाही. आजार जसजसा पुढे जातो तसतशी प्लेटलेटची पातळी बदलू शकते. त्यामुळे डेंग्यूचा संशय कायम असेल तर मुलाच्या क्लिनिकल स्थितीचे निरीक्षण करणे आणि गरजेनुसार पुन्हा टेस्ट करणे आवश्यक असू शकते.
मुलाला ताप आला असेल, विशेषतः त्यासोबत थंडी वाजणे, हुडहुडी भरणे, घाम येणे, डोकेदुखी, उलटय़ा किंवा वागण्यात/भानामध्ये बदल दिसत असेल तर मलेरियाचाही विचार करणे गरजेचे आहे. तसेच मुलाचे मलेरिया जास्त प्रमाणात आढळणाऱया भागात राहणे किंवा अशा भागात प्रवास करण्याचा इतिहास असेल तर मलेरियाचा संशय अधिक महत्त्वाचा ठरतो.
WHO Guidelines for Malaria (2025) नुसार, शक्य असेल तेव्हा मलेरियाचा संशय असलेल्या रुग्णामध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी peripheral blood smear किंवा quality-assured rapid diagnostic test (RDT) द्वारे परजीवीचा संसर्ग असल्याची खात्री करणे योग्य आहे.
चिकनगुनियाची सुरुवातही अनेकदा डेंग्यूसारखीच वाटू शकते. मात्र, तापासोबत सांध्यांमध्ये जास्त दुखणे किंवा सूज येणे, तसेच पुरळ, डोकेदुखी आणि स्नायूंमध्ये दुखणे ही काही उपयोगी क्लिनिकल संकेत असू शकतात. चिकनगुनियाची लॅबोरेटरी टेस्ट केल्याने तो डेंग्यू आणि इतर तापाच्या आजारांपासून वेगळा ओळखण्यास मदत होते.
प्रत्येक ताप आलेल्या मुलासाठी डासांमुळे होणाऱया सर्व आजारांची टेस्ट करण्याची गरज नसते. ताप किती दिवसांपासून आहे, कोणती लक्षणे आहेत, मुलाचे वय किती आहे, डासांमुळे होणाऱया आजारांचा संपर्क किंवा exposure किती आहे, त्या परिसरात सध्या कोणत्या आजारांचा प्रसार आहे आणि आजाराचा कोणता टप्पा आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन टेस्टिंग ठरवले पाहिजे.
लक्षणे लवकर ओळखल्यास निदानाला होणारा विलंब टाळता येतो. डासांची संख्या आणि डासांमुळे होणारे संसर्ग कमी करण्यासाठी मच्छर नियंत्रण हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा भाग आहे. घराच्या आसपास साचलेले पाणी काढून टाकणे, mosquito repellents वापरणे, मुलांनी शरीर झाकणारे कपडे घालण्याची काळजी घेणे आणि डासांपासून मुलांचे संरक्षण करणे यामुळे संसर्गाचा धोका कमी करता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य टेस्ट योग्य वेळी करून घेणे.






























































