
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपल्या कारवायांनी तेलामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. राज्य शासनानेही त्याची दखल घेतली आहे. यापुढे शासकीय, निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व मंत्रालयाच्या उपाहारगृहांमध्ये तेलकट पदार्थांवर निर्बंध घालून आरोग्यदायी अल्पोपाहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा आणि तशाच पद्धतीचा मेनू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय बैठका, कार्यक्रमांत अल्पोपाहार अथवा भोजन देताना आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यात केळी, सफरचंद, पेरू, पपई यांसारखी फळे, उकडलेली अंडी, उकडलेली कडधान्ये, पोहे, इडली-सांबार, गरम दूध, शुगर फ्री ग्रीन टी, नाचणी-ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी व उसळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जेवणामध्ये डाळ, उसळ, पालेभाज्या, ताक, कोशिंबीर, भाजी आणि आवश्यकतेनुसार संतुलित धान्यांचा समावेश करण्याची सूचना देण्यात आली आहे.
आरोग्यदायी मेनू देणाऱ्या कॅटरर्सनाच टेंडर नवे करार करताना आरोग्यदायी मेनू देणाऱ्या कॅटरर्सनाच टेंडर देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयाच्या पॅन्ट्रीमध्ये अंमलबजावणी सुरू मंत्रालय उपाहारगृहात फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पुंडलिक प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी पुणे जिल्ह्यातील पुंडलिक पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देत या प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या तरतुदीस आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे. पुंडलिक पाटबंधारे प्रकल्प येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा संयुक्त प्रकल्प आहे. सोलापुरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग प्रकल्पाला गती सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चार पदरी उन्नत मार्गीकेस आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी विविध शासकीय विभागांच्या जमिनी कोणतेही भोगवटा मूल्य न आकारता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित होणार असल्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होण्याचा मार्ग खुला झाला आहे.



























































