
आदिवासी विकास विभागातील भ्रष्ट व अनागोंदी कारभार, आश्रमशाळा, वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे सतत होणारे मृत्यू आदींकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात मंगळवारी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी उठाव केला. मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, आदिवासी विकास भवनावर धडक दिली. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, असा निर्धार करीत सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला.
राज्यातील आश्रमशाळांमध्ये दोन वर्षात विविध कारणांनी सुमारे 584 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी 18 ऑगस्टपासून नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आमरण उपोषण करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलन काळात दोन वेळा विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढला, तरीही सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे मंगळवारी सकल आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विराट उलगुलान मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करीत घोषणाबाजी केली. मंत्री उईके यांच्या राजीनाम्यासह सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस नेत्यांच्या भेटी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, डॉ. विक्रांत भुरीया, वसंत पुरके यांच्यासह पदाधिकाऱयांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. मागण्यांची माहिती घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
…या आहेत मागण्या
गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या तीन विद्यार्थिनींच्या पालकांना प्रत्येकी एक कोटी रुपये, जखमी विद्यार्थिनींना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी; या घटनेची चौकशी करण्यात यावी, ती पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱयांना जबाबदारीपासून दूर ठेवावे, या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित, दर्जेदार शासकीय आश्रमशाळेत प्रवेश द्यावा, सेंट्रल किचन कायमचे बंद करावे, आदिवासी विभागातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये सर्पदंश, अन्न विषबाधा यासह विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंची चौकशी ठराविक कालावधीत करावी इत्यादी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.


























































