
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची कोंडी चौथ्या दिवशीही कायम होती. सरकारचा प्रस्ताव घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला. हा प्रश्न अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी चर्चेला येऊ नये असे त्यांनी स्पष्ट बजावले. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर जरांगे यांच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत, अशी भूमिका मांडली. दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली असून, त्यांना उलट्या तसेच मळमळीचा त्रास होत आहे, मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याने आंदोलनस्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
58 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी महत्त्वाच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू होण्याअगोदर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई तसेच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली.
‘ओबीसी बचाव मोर्चा’ पोलिसांनी रोखला; लक्ष्मण हाके यांचा ठिय्या
दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबईकडे मंगळवारी सकाळी दहा वाजता निघालेला ओबीसी बचाव मोर्चा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोलनाक्यावर पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ उडाला. यवत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तब्बल तीन—साडेतीन तास आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखून धरली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.




























































